नांदेड(प्रतिनिधी)-सैन्य दलातील एका फौजीने आपली सात महिन्याची गर्भवती पत्नी आणि तीन वर्षाच्या बालिकेसह तिघांचा खून केल्याचा प्रकार आज सकाळी बोरी उमरज ता.कंधार येथे घडला. आपल्या पत्नी, लेकरांना मारून फौजी स्वत: माळाकोळी पोलीस ठाण्यात हजर झाला. या घटनेमुळे फौजीचे गाव बोरी उमरज आणि महिलेचे माहेर पळसवाडी येथे दुखाचे सावट पसरले आहे.
प्राप्त माहितीनुसार बोरी उमरज येथील शेतकरी पुत्र एकनाथ मारोती जायभाये (36) याला 8 वर्षापुर्वी सैन्यात नोकरी लागली. नोकरी लागल्यानंतर पळसवाडी ता.कंधार येथील व्यंकटी मारोती केंद्रे यांनी आपली मुलगी भाग्यश्रीचे लग्न फौजी असलेल्या एकनाथ जायभायेसोबत करून दिले. 5 वर्षापुर्वी लग्न झालेले आहे. लग्नानंतर एकनाथ आणि भाग्यश्रीच्या कुटूंबात सरस्वती नावाच्या मुलीचा जन्म झाला. सध्या एकनाथ जायभायेची नोकरी राजस्थानच्या बिकानेरमध्ये होती. काही दिवसांपुर्वी त्याची बदली झाली होती. नवीन बदलीचे ठिकाण पठाणकोट असे आहे. म्हणून तो 10 दिवसांपुर्वी आपल्या पत्नी भाग्यश्री (23), मुलगी सरस्वती (4) यांना घेवून गावाकडे आला. काल दि.12 सप्टेंबर रोजी त्याला परत जायचे होते. त्याचे तिकीट सचखंड एक्सप्रेसमध्ये बुक होते. परंतू कालच पत्नी भाग्यश्रीला ताप आला आणि त्याने भाग्यश्रीला कंधार येथील डॉक्टरांकडे तपासणी केली आणि गावाकडे गेला.
आज पहाटे 6 वाजेच्यासुमारास एकनाथ मारोती जायभाये या फौजीने आपली पत्नी भाग्यश्री(23), मुलगी सरस्वती (4) यांचा गळा दाबून त्यांचा खून केला. आणि स्वत: पोलीस ठाणे माळाकोळी येथे हजर झाला. आज भाग्यश्रीचा खून झाला तेंव्हा ती 7 महिन्यांची गर्भवती होती असे सांगण्यात आले. या संदर्भाने श्वांवरी वैद्यकीय प्रक्रिया आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. काही जण सांगतात काल डॉक्टरकडे तपासणी केली त्याचे कारण एकनाथला दुसरी मुलगी नको होती. म्हणून त्याने गर्भवती पत्नी, मुलगीसह तिघांचा खून केला आहे. माळाकोळीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय निलपत्रेवार यांनी सांगितले की, या प्रकरणाची गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे.
बोरी उमरज येथील काही लोक सांगतात एकनाथ जायभायेला आपली पत्नी भाग्यश्रीच्या चारित्र्यावर पण संशय होता. पण सत्य तर देवच जाणेल. परंतू आज एकाफौजीने आपल्या गर्भवती पत्नीसह मुलीचा खून केला आहे ही घटना दुर्देवी आहे.
फौजी नवऱ्याने गर्भवती पत्नीसह बालिकेचा खून केला; मारेकरी माळाकोळी पोलीसांच्या ताब्यात