खरीप हंगाम 2023 ची ई-पिक पाहणी तात्काळ पूर्ण करण्याचे कृषी व संबंधित विभागांना निर्देश

नांदेड (जिमाका)- खरीप हंगाम 2023 मध्ये मान्सूमचे आगमन उशिरा झाले आहे. तसेच संपूर्ण ऑगस्ट महिन्यात पावसामध्ये दिर्घ खंड पडल्यामुळे राज्यातील अनेक महसुली विभागामध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजना, नैसर्गिक आपत्तीचे सानुग्रह अनुदान अदा करण्यासाठी ई-पीक पाहणीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. तरी जिल्ह्यातील ख्ररीप हंगाम 2023 ची ई-पीक पाहणी तात्काळ करण्याचे, निर्देश कृषी व संबंधित विभागाला जिल्हा प्रशासनाने दिले.

नांदेड जिल्ह्याची ई-पीक पाहणी टक्केवारी 16.13 असल्याचे दिसून येत आहे. त्यापैकी भोकर-6.96 टक्के, उमरी 7.19 टक्के, अर्धापूर 7.61 टक्के, या तालुक्याची टक्केवारी 10 पेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच मुदखेड 10.95 टक्के, मुखेड 11.64, नांदेड 12.52 टक्के व माहूर 13.47 टक्के या तालुक्याची टक्केवारी 15 पेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याअनुषंगाने 100 टक्के खातेदाराची खरीप 2023 हंगामातील ई-पिक पाहणी पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्ह्यातील कृषी विभाग व महसूल विभागाने संयुक्तपणे विशेष मोहिमेचे आयोजन करुन ई-पीक पाहणी पूर्ण करावी,  असे जिल्हाप्रशासनाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *