नांदेड(प्रतिनिधी)- शेतातील धुऱ्यांमध्ये दगडे टाकून आपल्या शेतातील पाणी दुसऱ्या शेतात सोडल्याने दुसऱ्या शेताचे मालक भानुदास मनोहर कस्तुरे यांनी कोणतेतरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्यानंतर मुखेड तालुक्यातील हंगरगा येथील पाच जणांविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त करणे या सदराखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रेयस भानुदास कस्तुरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आमच्या शेताला लागून शेत असलेल्या राम संभाजी कांबळे, तुळशीराम बालाजी पताळे, यादव बालाजी पताळे, प्रकाश बालाजी पताळे, सुभाष राजाराम पताळे सर्व रा.हंगरगा ता.मुखेड यांनी शेताच्या धुऱ्यावर दगड टाकून त्यांच्या शेतातील अतिरिक्त पाणी आमच्या शेतात सोडून आमच्या शेतीचे नुकसान केले. या त्रासाला कंटाळून माझे वडील भानुदास मनोहर कस्तुरे (44) यांनी 24 जून रोजी रात्री 8 वाजेच्यासुमारास नवाक्रोन नावाचे शेतीत वापरण्याचे विषारी औषध पिले. उपचारादरम्यान 29 ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे माझ्या वडीलांच्या मृत्यू कारणीभुत ठरणाऱ्या पाच व्यक्तींवर कायदेशीर कार्यवाही व्हावी.
मुखेड पोलीसांनी याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 306, 34 नुसार गुन्हा क्रमांक 270/2023 दाखल केला आहे. पोलीस निरिक्षक आर.सी.वाघ यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरिक्षक बोधगिरे या घटनेचा तपास करीत आहेत.
पाण्यात बुडून मृत्यू
वरवट ता.हदगाव येथे एक 20 वर्षीय युवक बैलांना विहिरीजवळ पाणी पाजवतांना तोल जाऊन खाली पाण्यात पडून बुडून मरण पावला आहे. शंकर तुकाराम सुर्यवंशी यांनी दिलेल्या खबरीनुसार दि.16 सप्टेंबरच्या दुपारी 12.30 ते 17 सप्टेंबरच्या पहाटे 5.30 वाजेदरम्यान मौजे वरवट ता.हदगाव येथील युवक चांदु शंकरराव सुर्यवंशी हा स्वत:च्या जनावरांना चारा पाणी करण्यासाठी शेतात गेला होता. शेतात आपल्या जनावरांना विहिरीजवळ बनवलेल्या हौदाकडे नेऊन त्यांना पाणी पाजत असतांना त्याचा तोल गेला आणि चांदू सुर्यवंशी खाली विहिरीत पाण्यात पडून बुडून मरण पावला आहे. या प्रकरणी मनाठा पोलीसांनी आकस्मात मृत्यू दाखल केला असून पोलीस अंमलदार वडजे अधिक तपास करीत आहेत.
आपल्या शेतातील अतिरिक्त पाणी सोडून त्रास दिल्यामुळे एकाची आत्महत्या