नांदेड (प्रतिनिधी) -श्री दशमेश ज्योत इंग्लिश मेडियम स्कूल, गाडेगाव नांदेड या शाळेस चंद्रयान मोहिम – ३ यशस्वी करण्यात ज्यांचे बहुमुल्य योगदान होते, असे महेंद्रपालसिंघ यांनी १८ सप्टेंबर रोजी भेट दिली. या भेटी दरम्यान त्यांच्या व्याख्यानाचा छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. परिसंवादा दरम्यान विद्यार्थ्यांकडून महेंद्रसिंघ यांना काही प्रश्न विचारण्यात आले. त्या प्रश्नांची उत्तरे महेंद्रपालसिंघ यांनी दिली. तसेच चंद्रयान- ३ मोहिम यशस्वी करण्यात कोणकोणत्या अडचणी आल्या आणि आमच्या शास्त्रज्ञांनी त्या अडचणी कशा दूर केल्या ते सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले, माझे शिक्षण उत्तराखंडातील एका छोट्याशा सरकारी शाळेत झाले. माझ्या मनात शिक्षणाविषयी अतोनात ओढ होती. म्हणून मी शिकलो व तुमच्यापुढे आज इसरोचा शास्त्रज्ञ म्हणून उभा आहे. विद्यार्थ्यांनी हार न मानता पुढे जावे, असा मोलाचा सल्ला दिला व जीवनामध्ये कोणतीही बाब मेहनतीशिवाय मिळत नाही, एक शास्त्रज्ञ बनण्याची सुरूवात विद्यार्थीदशेपासूनच होत असते, विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासावृत्ती असावी लागते, असे सांगितले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्यांसह प्रथमेश बारापत्रे सिनीअर इंजिनीअर स्टेमरोबो टेक्नोलॉजीस हेही उपस्थित होते. त्यांनीसुद्धा विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीची विद्यार्थिनी सृष्टी खानसोळे हिने केले व विद्यार्थी प्रतिनिधी कार्तिक अग्रवाल याने उपस्थितांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे प्राचार्य, उपप्राचार्य तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.