नांदेड(प्रतिनिधी)-इंडिया मेगा ऍग्रो अनाज कंपनीविरुध्द 1014 शेतकऱ्यांची 16 कोटी 82 लाख 71 हजार 991 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नवीन गुन्हा दाखल झाला आहे.
संभाजी किशनराव ताटे रा.बावलगाव ता.मुखेड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जानेवारी 2021 ते डिसेंबर 2021 दरम्यान इंडिया मेगा ऍग्रो अनाज कंपनी लि.कृष्णुर ता.नायगाव (खै)चे व्यवस्थापकीय संचालक अजयकुमार चंद्रप्रकाश बाहेती, अविनाश कचरुलाल काबरा आणि नागोराव पुरभाजी बांद्रे यांनी सन 2021 मध्ये माझ्याकडून आणि इतर 1014 शेतकऱ्यांकडून हरभरा, सोयाबीन आणि हळद व इतर शेत माल घेतला होता. त्याचे पैसे दिले नाहीत. अडीच वर्षापासून खोटे बोलून आज देतो, उद्या देतो असे सांगत आहेत. त्यानुसार त्यांनी माझे 4 लाख 36 हजार 95 रुपयांचा शेत माल घेतला तसेच इतर 1014 शेतकऱ्यांचा मिळून 16 कोटी 78 लाख 35 हजार 896 रुपयांचा माल घेतला होता. असा एकूण 16 कोटी 82 लाख 71 हजार 991 रुपयांचा आमचा शेतमाल खरेदी करून इंडिया मेगा ऍग्रो अनाज कंपनीने अपहार केला आहे. या तक्रारीवरुन कुंटूर पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 406, 409, 506 आणि 34 नुसार गुन्हा क्रमांक 166/2023 दाखल केला आहे.या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक व्ही.आर.कुसमे हे करीत आहेत.
इंडिया मेगा ऍग्रो अनाज कंपनीविरुध्द 16 कोटी 82 लाख 72 हजार रुपये फसवणुकीचा गुन्हा दाखल