भारतातील शेवटच्या राजाविरुद्ध स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा म्हणजे मराठवाडा मुक्तीसंग्राम- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

  • मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवानिमित्त परिसंवादाचे  आयोजन
  • मराठवाडा मुक्ती संग्रामात महिलांचे योगदान लक्षणीय

नांदेड, (जिमाका) दि. 15:- निझाम हा भारतातील शेवटचा राजा होता. त्यांची राजसत्ता जूलमी राजसत्ता होती. या राजसत्तेला सामान्य जनतेने स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा म्हणून मराठवाडा मुक्तीसंग्राम अधिक महत्वाचा आहे. या लढ्याची माहिती परिसंवादाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने मुक्तीच्या या लढयात स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या कार्याची, घटनांची, योगदानाची माहिती आपण करुन घेवून ती इतरापर्यत पोहोचवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. नियोजन भवन येथे आयोजित मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवानिमित्त आयोजित परिसंवादात ते बोलत होते.

यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, संचालक डॉ. पृथ्वीराज तौर, प्राध्यापक  डॉ. विशाल पंतगे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा अभ्यास एल.के.कुलकर्णी, सहसंशोधक श्रीमती प्रतिक्षा तालंणकर, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र पांचगे व आदी मान्यवर व शालेय विद्यार्थ्याची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.

मराठवाडा मुक्ती च्या लढ्यातील स्मृतींना जपणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य–  संचालक डॉ. पृथ्वीराज तौर

मराठवाडा मुक्तीचा लढा हा सामान्य माणसाने एका जुलमी राजसत्तेविरुध्द दिलेला  लढा असून यात सर्व जाती धर्मातील लोक सामिल होते. यात सामान्य माणसे, महिला, तरुण मुले, सर्व घटकातील लोकांनी दिलेला सहभाग लक्षणीय आहे. या लढ्यात अनेक जणांनी हौतात्म्य पत्करले आहे. या सर्व हुतात्म्यांच्या स्मृतीना आज आपण उजाळा देवून त्या पुढील पिढीपर्यंत पोहोचविल्या पाहिजे. तसेच पुढील पिढीनेही या स्मृतीचा आदर करुन त्यांची जपवणूक केली पाहिजे, असे प्रतिपादन स्वारातीम विद्यापीठाचे संचालक डॉ. पृथ्वीराज तौर यांनी काढले.

मराठवाडा मुक्तीच्या हा लढ्यात अनेक ज्ञात-अज्ञात स्वांतत्र्यसैनिकांनी आपले योगदान दिलेले आहे. या लढयात स्टेट काँग्रेस सोबत आर्य समाज, हिंदु सभा, आंबेडकरी जनता, मजूर, गोरगरीब जनता यांनी संघटीतपणे दिलेला लढा आहे. या सशस्त्र लढयातील अनेक घटनावर आधारीत विविध पुस्तके आली आहेत. या लढयाची विस्तृत माहिती, घटनाक्रम, स्वातंत्र्य सैनिकांनी केलेले कार्य सर्वापर्यत पोहोचविण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे असे डॉ. पृथ्वीराज तौर यांनी सांगितले.

हैद्राबाद संस्थानाच्या मुक्तीचा लढयात संस्था आणि संघटनाच्या माध्यमातून आपण लोकशाही मूल्यांकडे, मराठवाडयाच्या मुक्तीकडे वाटचाल केली. विविध संस्था व संघटनाच्या माध्यमातून समाजात जाणीव जागृती, वैचारिक जाणीवा, प्रबोधन, सामाजिक, शैक्षणिक चळवळीच्या योगदानातून राजकीय चळवळी निर्माण झाल्या. अनेक चळवळीच्या माध्यमातून शस्त्रास्त्रासोबत हा लढा वैचारिक पध्दतीने लढला गेला हे या लढयाचे महत्वाचे वैशिष्ट आहे असे मत पिपल्स महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. विशाल पंतगे यांनी व्यक्त केले. या लढयात अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी हिंसेला हिंसेने उत्तर देण्यासोबतच वैचारिक प्रबोधनारवरही भर दिला.  अशा विविध संस्था व संघटनामधून हा वैचारिक लढा दिला गेला व यातून एक राष्ट्रप्रेमाची पिढी निर्माण झाली असे विचार  प्राध्यापक डॉ. विशाल पतंगे यांनी मांडले.

मराठवाडा मुक्तीच्या लढयात चूल व मुल सांभाळत महिला ही पुरुषांच्या बरोबरीने लढल्या. या लढयात महिलांनी आपले योगदान अधोरेखित केले आहे. रझाकाराच्या विरोधाला झुंगारुन देत या लढयात त्यांनी अनेक जोखमीची कामे केली. यासोबतच स्वातंत्र्यसैनिकांच्या पोषणाची महत्वाची जबाबदारी त्यांच्यावर होती ती त्यांनी जबाबदारीने पार पाडली. वेळप्रसंगी आपल्या कुटूंबाला दुय्यम स्थान देवून अनेक प्रसंगाना धीराने तोंड दिले याबाबत स्वारातीम विद्यापीठाच्या सहसंशोधक प्रतिक्षा तालंणकर यांनी अनेक प्रसंग यावेळी सांगितले. मराठवाडा मुक्ती संग्रामातील गंगुताई देव, दगडाबाई शेळके, गोदावरीबाई टेके, बोधनकर भगिनी, कावेरीताई, ताराबाई परांजपे, प्रतिभाताई वैशपान, विमलताई मेलटेके अशा अनेक ज्ञात अज्ञात महिलांनी दिलेले योगदान, सहभाग, घटना, प्रसंग यांची सविस्तर माहिती  प्रतिक्षा तालंणकर यांनी दिली.

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात मराठवाडयातील 200 तरुण मुलांना प्रशिक्षण देवून या सामान्य घरातील मुलांनी 8 गावे स्वातंत्र्य करुन गोवर्धन सराळा समाजवादी जनराज्य निर्माण केले. ही इतिहासातील घटना अनेक जणांना माहिती नाही. आपल्या जिल्ह्यातील अनेक स्वातंत्र सैनिकांचा या लढयात सहभाग होता. इतिहासात हा गोवर्धन सराळा मुक्तीचा लढा म्हणून हा ओळखला जातो.  या लढयात स्वातंत्र्यसैनिकांनी निरपेक्षपणे लढून 8 गावाचे मिळून एक वेगळया जनराज्याची निर्मिती केली ही विशेष घटना आहे. या लढयातील स्वातंत्र्य सैनिकांसारखे आपणही निरपेक्ष जगले पाहिजे, असे सेवानिवृत्त शिक्षक एल.के.कुलकर्णी यांनी विद्यार्थी व उपस्थितीना सांगितले. जगात नेहमी महान कार्य झाले, महान कार्य करायचे आणि महान कार्य होतील आपण यापैकी एक व्हायचे असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच या लढयातील अनेक घटनाक्रमावर कुलकर्णी सरांनी प्रकाश टाकला. या लढयात केशवराव कुलकर्णी या त्यांच्या वडीलांचा असलेला सहभाग त्यांनी केलेले कार्य याबाबतही माहिती सांगितली. तसेच स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या कार्याबाबत विस्तृत घटनांची माहिती सांगितली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *