नांदेड(प्रतिनिधी)-शिवाजीनगर गुन्हे शोध पथकाने सध्या गणेश उत्सवादरम्यान गस्त करत असतांना पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय असणाऱ्या एका युवकाकडून विकण्यासाठी आणलेले दोन गावठी पिस्टल आणि पाच जिवंत काडतूस जप्त केले आहेत. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, शहर विभागाचे पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव यांनी शिवाजीनगर गुन्हे शोध पथकाचे या कामगिरीसाठी कौतुक केले आहे.
आज दि.22 सप्टेंबर रोजी शिवाजीनगर येथील गुन्हे शोध पथकाचे प्रमुख मिलिंद मधुकर सोनकांबळे हे आपल्या पोलीस अंमलदार बामणे, शेख, देवसिंह सिंगल, दिलीप राठोड, विष्णु डफडे यांच्यासह पोलीस ठाणे शिवाजीनगरच्या हद्दीतील सार्वजनिक गणेश मंडळाच्या स्थळांना भेट देत असतांना दत्तनगरमध्ये त्यांना माहिती मिळाली की, एक व्यक्ती गावठी कट्टे विक्री करण्यासाठी आलेला आहे आणि तो नवा मोंढा येथे थांबलेला आहे. तेंव्हा सोनकांबळे यांनी आपले वाहन नवीन मोंढा भागातील मार्केट कमिटीच्या मागे नेले. तेथे त्यांना संशयीत वाटलेला युवक त्यांनी हेरला त्याचे नाव संजय लोकेंद्रसिंह परिहार (26) व्यवसाय पाणीपुरी विक्री रा.बिल्हेटी ता.भांडेर जि.दतीया रा.मध्यप्रदेश ह.मु.प्रफुल्लनगर चिखलवाडी भोकर पोलीस पथकाने त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे दोन गावठी पिस्तुल आणि जिवंत पाच काडतुसे पकडली. गावठी पिस्तुलांची किंमत 25 हजार रुपये आहे आणि जिवंत काडतुसांची किंमत 5 हजार रुपये आहे. असा 30 हजारांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे. आपण केलेली कामगिरी मिलिंद सोनकांबळे यांनी पोलीस निरिक्षक मोहन भोसले यांना सांगितले आणि त् यांच्या मार्गदर्शनात पुढील कायदेशीर कार्यवाही पुर्ण केली. शिवाजीनगर पोलीसांच्या या कामगिरीमध्ये चार्लीगाडीचे आकाश सावंत आणि सायबर विभागाचे राजेंद्र सिटीकर आणि दिपक ओढणे यांचीही मदत आहे. पोलीस उपनिरिक्षक मिलिंद सोनकांबळे यांनी याबाबत संजय परिहारविरुध्द भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यासाठी फिर्याद दिली आहे.वृत्तलिहिपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पुर्ण झाली नव्हती.
सध्या सुरू असलेल्या गर्दीच्या कार्यक्रमात अर्थात गणेश उत्सवादरम्यान अशा पध्दतीने शिवाजीनगर पोलीसांनी केलेले कामगिरी प्रशसंनियच आहे.छोटी दक्षता बाळगली तरी आपण मोठा धोका टाळू शकतो असे यावरुन दिसतो.
