रस्ते की पाठशाला व्ही स्कुल ॲपचे उद्घाटन

नांदेड (जिमाका) – इयत्ता पहिली ते दहावी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये रस्ते सुरक्षा विषयी जनजागृती व्हावी म्हणून “रस्ते की पाठशाला” हे व्हीस्कुल ॲपच्या माध्यमातून तयार करण्यात आले आहे. या रस्ते की पाठशालाचे विमोचन नुकतेच 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या पर्वावर पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड यांच्या संकल्पनेतून व वोपा स्वयंसेवी संस्था यांच्या मदतीने करण्यात आलेले हे ॲप सर्व विद्यार्थ्यांना वापरासाठी सुरू करण्यात आले आहे.

यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार राजेश पवार, आमदार बालाजी कल्याणकर, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. शशिकांत महावरकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत, जिल्ह्यातील सर्व विभागाचे कार्यालय प्रमुख व वोपा स्वयंसेवी संस्थेचे प्रमुख व्यक्ती, सदस्य आदी उपस्थित होते.

या ॲपबद्दल उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी माहिती दिली. ॲपमधील व्हिडिओ प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांनी स्वत: प्रत्यक्ष पाठ शिकवून सादर केला. या ॲपमधील व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे म्हणजे रस्ता सुरक्षाविषयी नियमावलीची माहिती दिली आहे. रस्ता सुरक्षिततेची माहिती बाल वयात प्राप्त झाल्यास पुढची पिढी ही जागरूक होईल. यामुळे वाहन चालवितांना रस्ते सुरक्षिततेची माहिती होऊन संभाव्य अपघात टाळता येतो, अशी माहिती त्यांनी दिली. “रस्ते की पाठशाला” या ॲप मधील व्हिडिओ हे इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आले असून त्याचा वापर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी करावा. तसेच पालकांनी सुद्धा हे व्हिडिओ बघावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *