दिव्यांग बालकांसाठी 5 ते 7 असे तीन दिवस मोफत तपासणी व उपचार शिबिर
नांदेड(प्रतिनिधी)-सध्याच्या परिस्थितीत ऑटीझम (आत्मकेंद्रीपणा) या रोगाचे वाढते प्रमाण दिव्यांग बालकांमध्ये जास्त असून बालकाच्या पहिल्या-दुसऱ्या वर्षात त्याची चाचणी होणे आवश्यक आहे. तर त्या रुग्णांवर 80 टक्केपेक्षा जास्त प्रमाणात सुधारणा करता येण्यासारखे असल्याचे मत डॉ.लक्ष्मीकांत बजाज यांनी केले.
येत्या 5,6 आणि 7 ऑक्टोबर रोजी जय वकील फाऊंडेशन मुंबई, कमल उडवाणिया फाऊंडेशन मुंबई आणि बी.जे.वाडीया हॉस्पीटल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेडच्या राजस्थानी एज्युकेशन सोसायटी आणि आर.आर.मालपाणी मतिमंद विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मेंदु उपचार शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या प्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश गिल्डा, डॉ.अरुण तोष्णिवाल, अंकित अग्रवाल, लड्डा, मालपाणी, जयप्रकाश काबरा, मुख्याध्यापक निर्मल यांची उपस्थिती होती.
या प्रसंगी बोलतांना आज आपण जी मतिमंद मुले पाहतो ती आठ ते दहा वर्षाच्यावरची आहेत.पण बालक-बालिका एक-दोन वर्षाची असतांना सुध्दा त्यांच्यातील दिव्यांग त्रास शोधता येतो. त्याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. आजच्या परिस्थितीत ऑटीझम(आत्मकेंद्रीपणा) या रोगाचे प्रमाण वाढत आहे. त्यावर लक्ष देण्याची गरज आहे. यावेळेस उदाहरण सांगतांना डॉ.लक्ष्मीकांत बजाज म्हणाले की, अर्धापूर तालुक्यातील जवळपास प्रत्येक गावात सर्वेक्षण करण्यात आले होते आणि त्यातून शोधलेल्या अशा दिव्यांग बालकांवर उपचार करण्यात आले. त्यातील 50 ते 60 टक्के रुग्ण बरे झाले आहेत. आपण त्यांना सुपरमॅन बनवू शकत नाही पण सर्वसामान्य जीवनात तो आत्मसन्मानाने जगेल अशी अवस्था तयार करता येते. त्यासाठी आई-वडीलांनी आणि पालकांनी त्यावर लक्ष देण्याची गरज आहे. आजाराचे काही भाग हे नशिबावर अवलंबून असतात असे सुध्दा डॉ.बजाज म्हणाले. या उपचार शिबिराची सुरूवात फक्त मेंदु रोगांपासून झाली होती. आता दिव्यांग बालकांना मणक्यांच्या आजारावर उपचार देण्यासाठी सुध्दा डॉक्टर्स येणार आहेत.वाडीया हॉस्पीटलच्या डॉ.अनैता हेगडे यांच्या नेतृत्वात यंदा 38 डॉक्टर्स येणार आहेत.त्यात दिव्यांग बालकांना असलेल्या इतर रोगांवर उपचारांसाठी मोठी सोय होणार आहे.
याप्रसंगी बोलतांना संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश गिल्डा म्हणाले, यंदा निजामाबाद, कामारेड्डी येथून सुध्दा रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात पत्रकारांचा मोठा सहभाग आहे. आम्ही दररोजचे काम करतांना सुध्दा आम्हाला हे शिबिर कायम व्हावे असे वाटत असते. आम्ही आता हे शिबिर निजामाबाद आणि कामारेड्डी येथे सुध्दा व्हावे यासाठी प्रयत्न करणार आहोत.

याप्रसंगी आर.आर.मालपाणी विद्यालयाचे मुख्याध्यापक निर्मल म्हणाले की, यंदाचे हे शिबिर 24 वे शिबिर आहे. पुढच्यावेळेस शिबिराचा रोप्यमहोत्सव होईल. मालपाणी विद्यालयाने 18 हजार विद्यार्थ्यांचा डाटा तयार केला आहे. पुढे केंद्र सरकारच्यावतीने त्यांना मिळणाऱ्या सर्व सुविधा एका झटक्यात मिळू शकतील. यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. दररोज 125 प्रमाणे आम्ही रुग्णांची नोंदणी केली आहे. त्यातील 175 रुग्णांची नोंद झाली आहे. यापेक्षा जास्त रुग्ण आले तरी पुढच्या शिबिरात ज्यांना कमी गरज आहे. अशांचे क्रमांक लावले जातील अशी माहिती निर्मल यांनी दिली.
मणक्यांचे तज्ञ डॉक्टर येणार हे विशेष
यंदाच्या शिबिरात दिव्यांग बालकांमध्ये असणाऱ्या मणक्यांच्या आजारासाठी मणक्यांचे तज्ञ डॉक्टर यंदा येणार आहेत ही सर्वात उत्कृष्टबाब ही 24 व्या दिव्यांग उपचार शिबिरामध्ये आहे. दिव्यांग बालकांना फक्त तो एकच आजार असतो असे नाही तर सर्वसामान्य माणसांना होणारे इतर आजार सुध्दा त्यांना होत असतात. त् यात मणक्यांचा आजार हा सर्वात महत्वपुर्ण आहे आणि यंदा मणक्यांचे तज्ञ डॉक्टर्स शिबिरात सहभागी होणार आहेत. त्यामुळे ती समस्या सुध्दा मोठ्या प्रमाणात कमी करण्यात यश येणार आहे.