नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे स्थानिक आमदार बालाजी कल्याणकर यांना 1650 कोटी रुपयांचा निधी दिला असून त्या निधीमधून कार्यकर्ते आणि संघटन मोठे करण्यासाठी कोणतेही प्रयत्न आ.बालाजी कल्याणकर करत नाहीत असा आरोप शिंदे गटाचे माजी नगरसेवक अशोक उमरेकर यांनी केला. सोबतच वंचित शिवसेनीकांच्या बैठकीत आम्ही आमची मागणी लावून धरतांना नांदेड जिल्ह्याचा पालकमंत्री बदलावा अशी मागणी माजी नगसेवक तुलजेश यादव यांनी केली.
आज वंचित राहिलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांची एक बैठक शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर अशोक उमरेकर आणि तुलजेश यादव हे पत्रकारांशी बोलत होते. आमदारांनी कार्यकर्त्यांना निधी दिला तर हे कार्यकर्ते पैसे जमा करून मोठे होतील आणि माझ्याविरुध्द लढतील अशी भिती त्यांना वाटते परंतू आम्ही बाळासाहेबांचे, एकनाथ शिंदे यांचे शिवसैनिक आहोत संघटनेसाठी काम करतो.आम्ही रात्रंदिवस मेहनत करून तुम्हाला पुर्वी सुध्दा निवडूण आणले होते. आता मतदार संघाचे काम पाहणे आपले काम आहे आणि संघटनेचे काम पाहणे आमचे काम आहे. पण आमदार कल्याणकर दाखवतात की, मी या उत्तर विधानसभा मतदार संघाचा मालक आहे.शिवसेना माझ्या घरची आहे. शिवसेना पक्षाची पाटी प्रकाशित करायची नाही, कोणतेही आंदोलन करायचे नाही अशी आ.बालाजी कल्याणकर यांची भुमिका आहे. त्यामुळे आम्ही त्रस्त झालो आहोत. जिल्हा प्रमुख आनंद बोंढारकर यांनी सुध्दा भरपूर निधी आणतात पण त्याचा उपयोग कार्यकर्त्याासाठी काही होत नाही. दक्षीण आणि उत्तर दोन्ही भागातील शिवसैनिक वाऱ्यावर आहेत तर मग निधी कोठे जात आहे.कॉंगे्रस पक्षातून शिवसेनेत आलेल्या लोकांना जास्त भाव दिला जात असून त्याबद्दल आम्हालाही काही अडचण नाही पण कालच्या आलेल्या लोकांना समोरची लाईन आणि आम्हाला किंमत नाही ही बाब असहनशिल आहे. आम्ही पक्षाच्याविरोधात कोणतेही काम करणार नाही. दक्षीणचे जिल्हाप्रमुख आनंद बोंढारकर आणि उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या त्रासाला कंटाळूनच आम्ही आजची बैठक घेतली आहे.

नऊ वर्षापासून शिवसेना सत्तेत होतील पण या कार्यकाळात कार्यकर्त्यांना कोणत्याही सत्तेचा लाभ मिळालेला नाही असे दु:ख माजी नगरसेवक तुलजेश यादव यांनी व्यक्त केले. पालकमंत्री गिरीश महाजन यांना बदलून शिवसेना पक्षातील व्यक्ती नांदेडचा पालकमंत्री करण्याची मागणी तुलजेश यादव यांनी केली. गिरीश महाजनच्यावतीने कोणतीही मदत शिवसैनिकांना मिळालेली नाही. निधी दिल्याशिवाय आणि कार्यकर्त्याला मोठे केल्याशिवाय राजकीय पक्ष वाढत नाही आणि गिरीश महाजन शिवसैनिकांना या संदर्भाने काही मदत करत नाहीत म्हणून ते बदलणची गरज आहे.