नवा मोंढा परिसरात अज्ञात लोकांनी भुखंड ताब्यात घेण्यासाठी दुकान नेस्तनाबुत केली

नांदेड(प्रतिनिधी)-भुमाफियांनी वेगवेगळ्या समस्येत असलेले भुखंड बळकावण्याचा सुरू केलेला प्रकार गणेश विसर्जनाच्या रात्री सुध्दा झाला आहे. या बाबत शिवाजीनगर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नवीन मोंढा भागात 28 सप्टेंबरच्या रात्री अर्थात सर्वत्र गणपती विसर्जन होत असतांना एक टीन शेड काढून जमीनदोस्त करण्यात आले. हा भुखंड नवीन मोंढा भागात अत्यंत मोक्याच्या जागेवर आहे. एकूण या भुखंडाची व्याप्ती 5 हजार चौरसफुट आहे. त्यातील 1000 चौरस फुटवर विनोदकुमार कैलासकुमार ओझा यांचे भुसार साहित्याचे दुकान होते.
मुळात हा सर्व 5 हजार चौरस फुटाचा भुखंड विनोदकुमार ओझाच्या आजी(नानी) यांचा आहे. त्यातील 1000 चौरस फुटावर विनोदकुमार ओझाचे दुकान आहे. या आजीबाईकडून काही भुमाफियांनी हा 5 हजार चौरस फुटाचा भुखंड काही महिन्यांपुर्वी नोंदणीकृत विक्री खताद्वारे खरेदी केला आहे म्हणे. त्यातील 1 हजार चौरस फुटाची जागा विनोदकुमार ओझाच्या ताब्यात होती. विनोदकुमार ओझा जागा रिकामी करत नाही म्हणून भुखंड माफियांना अनेक अडचणी येत होत्या. त्यात भुखंड माफियांनी पोलीस विभाग गणपती विसर्जनात व्यस्त असतांना त्या रात्री विनोदकुमार ओझाचे दुकान नेस्तनाबुत करून टाकले. हा गुन्हा 30 सप्टेंबर रोजी शिवाजीनगर पोलीसांनी उशीरा तक्रार दिली म्हणून दाखल केला आहे. विनोदकुमार ओझाच्या तक्रारीनुसार त्यांच्या दुकानातील गहु, ज्वारी व वेगवेगळ्या प्रकारच्या दाळीचे एकूण 200 पोते, 5 हजार रुपये रोख रक्कम, 5 हजार रुपयांचा वजन काटा, 10 हजार रुपयांची इन्वटर बॅटरी असा एकूण 2 लाख 70 हजारांचा ऐवज कोणी तरी अज्ञात व्यक्तींनी चोरुन नेला आहे. शिवाजीनगर पोलीसांनी जे कोणी अज्ञात व्यक्ती असतील त्यांच्याविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 379, 427 नुसार गुन्हा क्रमांक 326/2023 नुसार दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पोलीस निरिक्षक मोहन भोसले यांच्या कुशल मार्गदर्शनात तपास सहाय्यक पोलीस माने हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *