नांदेड (जिमाका) :- जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवसाच्या औचित्याने समाज कल्याण कार्यालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंग, फेस्काम, मराठवाडा प्रादेशिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 3 ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे ‘कर्तव्याचे देणे’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदे व योजनाविषयक बाबींची माहिती, वृध्दांचे हक्क, जेष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा, ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन इत्यादीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दलजीत कौर जज या आहेत. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. प्रमुख व्याख्याते प्रसिध्द मानसोपचार तज्ज्ञ डॉ. नंदकुमार मुलमुले, संधी निकेतन शिक्षण संस्था वडगावचे निवृत्ती वडगावकर, अर्थक्रांती राष्ट्रीय आर्थिक साक्षरता मंचचे विजय देशमुख यांचे मार्गदर्शन लाभणार आहे, अशी माहिती प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.