नांदेड(प्रतिनिधी)-हाफकिन या औषधी पुरवठा करणाऱ्या संस्थेने नांदेडच्या शासकीय महाविद्यालय तथा रुग्णालयाला वेळेवर औषधी पुरवल्या नाहीत आणि औषधांचा तुटवडा पडला म्हणून गेल्या 24 तासात 12 मोठे व्यक्ती आणि 12 नवजातशिशु ज्यामध्ये 6 पुरूष जातीचे शिशु आणि 6 महिला जातीचे शुश मरण पावल्याचे दुर्देवी घटना घडली आहे. घटनेचे गांभीर्य कळताच महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री नांदेडला येणार असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी सांगितली.
राज्यातील शासकीय रुग्णालयातील औषधांअभावी मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दोन महिन्यांपुर्वी ठाणे येथील महानगरपालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालय औषधाच्या तुटवड्यामुळे एकाच दिवशी 18 रुग्णांचे उपचाराअभावी मृत्यू झाला होता. त्या पाठोपाठ नांदेड येथील डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील रुग्णालयात दि.2 ऑक्टोबर रोज सोमवारी एकाच दिवशी 24 रुग्णांचा औषधांच्या तुटवड्यामुळे मृत्यू पडल्याचे गंभीर घटना घडली आहे. याबाबत महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांनी या बाबतची माहिती दिली. या ठिकाणी नांदेड जिल्ह्यासह इतरही जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी दाखल होता. यात सर्पदंश आणि विषारी औषध प्राशन केलेले रुग्ण मोठ्या प्रमाणात येत असतात. यासाठी औषधे मुंबई येथून मागवावी लागतात आणि ही औषधे पुरवठा करण्यासाठी हाफकीन या संस्थेला राज्य शासनाने औषधे पुरवठा करण्याचे कंत्राट दिले आहे. मागील अनेक महिन्यांपासून या कंपनीने औषधी पुरवठा केले नाहीत अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
या घटनेची माहिती कळताच माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी विष्णुपूरी रुग्णालयास भेट दिल्याची माहिती समोर आली आहे. याचबरोबर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून राज्याचे आरोग्य मंत्री दि.3 रोज मंगळवारी येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
औषधीच्या तुटवड्यामुळे रुग्णांचे प्राण गेले असतील तर त्याची जबाबदारी निश्चित होणे आवश्यक आहे. हाफकिनने वेळेत औषधी न पुरवल्यामुळे या मृत्यूच्या घटना घडल्याचे सांगितले जात आहे. पण त्यात मरण पावणारी नवजात शिशु का मरण पावले आहेत याचा शोध होण्याची गरज आहे. त्याची जबाबदारी सुध्दा निश्चित करून दोषींवर कार्यवाही व्हावी अशी मागणी मरण पावलेल्या रुग्णांचे नातेवाईक करत आहेत.
राज्यात सुरू असलेले मोठ-मोठे खाजगी रुग्णालय रुग्णांचे बिल कसे वाढेल याचाच प्रयत्न करतात. त्यांच्या दृष्टीकोणातून रुग्ण मरणाकडे वाटचाल करत आल्याची परिस्थिती दिसत असली की, ते खाजगी रुग्णालय त्या रुग्णायलय आता सरकारी रुग्णालयात नांदेड, मुंबई, हैद्राबादकडे जाण्यासाठी सल्ला देतात. शासकीय रुग्णालयात असा रुग्ण आला तरी शासकीय रुग्णालयावर हे बंधन असते की, मी हा रुग्ण घेणार नाही असे त्यांना म्हणता येत नाही आणि त्यानंतर रुग्णाचा मृत्यू शासकीय रुग्णालयात झाला तर बदनामी मात्र शासकीय रुग्णालयाचीच होते या दुर्देवाला काही करता येईल काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.
विष्णुपूरी शासकीय रुग्णालयात औषधाअभावी 24 रुग्णांचा मृत्यू