स्थानिक गुन्हा शाखेने 7 गावठी पिस्टल आणि 116 जिवंत काडतूसे पकडली

 

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरात अग्नीशस्त्रे (गावठी पिस्टल) चा वापर जास्त झाला असल्याचे दिसतच आहे. या पार्श्र्वभूमीवर स्थानिक गुन्हा शाखेने गावठी पिस्टल पुरवणाऱ्या चार जणांना पकडले असून त्यांच्याकडून सात गावठी पिस्टल आणि 116 जिवंत काडतूस असा 3 लाख 3 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर हे उपस्थित होते.
मागील काही वर्षांपासून गावठी पिस्टलांचा वापर करून धमक्या देणे, खंडणी वसुल करणे असे अनेक प्रकार घडले होते. स्थानिक गुन्हा शाखेत नव्याने रुजू झालेल्या सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे यांना मिळालेल्या माहितीची सर्व सविस्तर हकीकत आपले वरिष्ठ अधिकारी पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांना सांगितली. यामध्ये पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार आणि डॉ.खंडेराय धरणे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हा शाखेने नांदेड ते नाळेश्र्वर जाणाऱ्या रस्त्याजवळ आरटीओ ऑफीसजवळ कमलेश उर्फ आशु पाटील बालाजी लिंबापुरे (23) रा.गॅसगोडाऊनजवळ वसरणी नांदेड, बलबिरसिंग उर्फ शेरा प्रतापसिंग जाधव (21) रा.हिंगोली गेट नांदेड, शेख शहबाज शेख शकील(23) रा.दुधडेअरीजवळ रहिमपुर, शामसिंघ उर्फ शाम्या गेंदासिंघ मठवाले(23) रा.तहसील कार्यालयाच्या पाठीमागे असे दिसले.  त्यांनी पोलीस पथकावर हल्ला चढवला. तेंव्हा पोलीस पथकाने आपल्या बळाचा वापर करत त्या चौघांवर नियंत्रण मिळवले आणि त्यांना ताब्यात घेतले. या लोकांनी फक्त पिस्तुलांचा व्यवसाय केला नाही तर ते हात बॉम्ब सुध्दा आणण्याच्या तयारीत होते. हा प्रकार ते 2020 पासून करत आहेत. या चार जणांनी हैद्राबाद येथे आशिष सपुरे आणि रबज्योतसिंघ उर्फ गब्या तिवाना यांनाही मोठ्या प्रमाणात गावठी पिस्टल पुरविण्याचे कटकारस्थान रचलेले आहे. आशिष सपुरे  आणि रबज्योतसिंघ उर्फ गब्या या चौघांना पैसे पुरवत होते अशी माहिती पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकटे यांनी दिली त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वृत्तलिहिपर्यंत पुर्ण झाली नव्हती. पकडलेल्या दोघांविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 353, 120(ब) आणि भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वृत्तलिहिपर्यंत पुर्ण झाली नव्हती.
या पोलीस पथकात सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे, पांडूरंग माने, पोलीस उपनिरिक्षक गोविंदराव मुंडे, दत्तात्रय काळे, सचिन सोनवणे, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक माधव केंद्रे, संजय केंद्रे, पोलीस अंमलदार बालाजी तेलंग, गुंडेराव कर्ले, संजीव जिंकलवाड, बालाजी यादगिरवाड, ताणाजी येळगे, गजानन बयनवाड, ज्वालासिंग बावरी, विलास कदम, देवा चव्हाण, रणधिर राजबन्सी, हनुमान ठाकूर, शेख कलीम, बालाजीराव मुंडे, दादाराव श्रीरामे, राजू पुलेवार, बजरंग बोडके, सायबर सेलचे दिपक ओढणे आणि राजू सिटीकर यांचा समावेश होता.
जनतेला पोलीसांचे आवाहन
सध्याच्या युगात तरुण मुलांना शस्त्रांचे आकर्षण झाले आहे. त्यामुळे शस्त्रासोबत फोटू काढून ती मिरवणे हा एक दुर्देवी प्रकार सुरू आहे. जनतेतील पालकांनी आपल्या मुलांना असे न करण्याबाबत सुचना द्यावी असे आवाहन पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले. नागरीकांनी जगात वावरतांना आपल्या आसपास घडणाऱ्या छोट्या-छोट्या गोष्टींवर बारीक लक्ष ठेवून त्याची माहिती पोलीसांना दिली तरी बरेच अपराध थांबवता येतील. कायद्याची अंमलबजावणी करतांना सर्व सामान्य नागरीकांना त्रास होणार नाही याबद्दल जास्त लक्ष ठेवले जाते म्हणून विशेष गुप्त माहितीच्या आधारावर कायद्याची अंमलबजावणी करणे जास्त योग्य असते. म्हणून आम्ही त्यावर भर देतो. शहरात आणि जिल्ह्यात कोणी आरेरावी करत असेल, भिती दाखवत असेल, खंडणी मागत असेल अशी माहिती पोलीसांना दिली तर त्यांच्यावर जरब बसविण्यासाठी आम्ही कायम कटीबध्द असल्याचे श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले.
व्हिडीओ….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *