शासकीय रुग्णालयातील अस्वच्छता शरमेची बाब
नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील डॉ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात असलेली अस्वच्छता शरम आणणारी आहे असे प्रतिपादन राज्याचे आरोग्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
24 तासात 24 जणांचा मृत्यू आणि आजपर्यंतच्या पुढील 12 तासात पुन्हा 6 जणांचा मृत्यू असे 30 मृत्यू घडल्यानंतर राज्याचे आरोग्य मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री गिरीश महाजन हे अत्यंत जलदगतीने नांदेडला आले होते. सर्व प्रथम दोन्ही मंत्री, इतरांनी रुग्णालयास भेट दिली आणि त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री गिरीश महाजन, खा.प्रताप पाटील चिखलीकर, आ.राम पाटील रातोळीकर, आ.शिंदे, आ.राजेश पवार, आरोग्य संचालक म्हैसेकर, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार असे सर्व पत्रकार परिषदेत उपस्थित होते.
याप्रसंगी पुढे बोलतांना हसन मुश्रीफ म्हणाले की, नांदेडच्या रुग्णालयात असलेली अस्वच्छता ही शरम आणणारी बाब असल्याची परिस्थिती आहे. या परिस्थितीवर आम्ही लवकरात लवकर नियंत्रण आणू. नांदेडचे रुग्णालय 500 खाटांचे आहे. पण 1 हजारांपेक्षा जास्त रुग्ण येतात. त्यामुळे भौतिक सुविधांची सुधा कमतरता आहे. नांदेड शासकीय रुग्णालयात नांदेडच्या आसपासमधील जिल्ह्यातून, तेलंगणा राज्यातून सुध्दा रुग्ण येतात. त्यामुळे रुग्णांची वाढ भरपूर आहे. खाजगी दवाखान्यांकडून शेवटच्या क्षणाला रुग्ण शासकीय रुग्णालयात पाठविला जातो.(वास्तव न्युज लाईव्हने या शब्दांबद्दल कालच बातमी प्रसिध्द केली होती.) त्यामुळे येणाऱ्या रुग्णाला शासकीय रुग्णालयास नाकारता येत नाही. म्हणजे गंभीर परिस्थितील रुग्णच शासकीय रुग्णालयात येतात.आज तयार झालेल्या परिस्थितीसाठी आम्ही इतर रुग्णांलयांकडून तज्ञ व्यक्ती आम्ही पाठवत आहोत. काही पदे वर्ग-1 ते वर्ग-4 ची रिक्त आहेत. ती पदे लवकरात लवकर नांदेडच नव्हे तर राज्यभर भरण्यासाठी काम करू. सध्या सफाईच्या वाईट परिस्थितीबद्दल त्याचे आऊटसोर्सिंग करण्यासाठी प्रयत्न करत आहोत.
घडलेल्या घटनेची जबाबदारी शासन म्हणून आमचीच आहे. यापुढे एकही मृत्यू होणार नाही. यासाठी आम्ही पुर्णपणे दक्षता बाळगत असून झालेल्या 30 मृत्यूंची व्यक्तीगत चौकशी होईल आणि जो दोषी असेल त्याला सोडले जाणार नाही. शासकीय रुग्णालयात औषधांच्या कमतरतेची अनेक उदाहरणे पत्रकारांनी हसन मुश्रीफ यांना सांगितली. खाजगी मेडीकल दुकानदारांचे एजंट दिवसभर दवाखान्यात फिरतात, रुग्णांना खाजगी रुग्णालयात पाठविले जाते. या सर्व शब्दांसह हसन मुश्रीफ यांनी पुढच्या दहा दिवसात आपल्याला हा सर्व बदल दिसेल असे सांगितले.
नांदेड रुग्णालयात घडलेल्या मृत्यूंच्या वणव्याचा परिणाम चुकीचा होवू शकतो या उद्देशाने पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराय धरणे, पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव, सुशिलकुमार नायक यांनी आपल्या फौजफाट्यासह चोख बंदोबस्त ठेवला होता.
खा.हेमंत पाटील यांचे कृत्य अयोग्य

24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू या घटनेनी संपुर्ण राज्य हदरून गेले. अनेकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या. यात हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयात धाव घेवून शौचालय साफ नसल्याचे दिसल्यानंतर त्यांनी थेट अधिष्ठाता यांना बोलावून त्यांच्या हाताने साफ करून घेतले. याबाबत हसन मुश्रीफ यांना विचारले असता त्यांनी मला माहित नाही. पण जे काही खासदार पाटील यांनी हे कृत्य केल आहे. ते योग्य नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. याच बरोबर खा.पाटील यांनी या अगोदर रुग्णालयास कधी भेट दिली? आणि अस्वच्छतेच्या बाबतीत साधी चौकशी तरी या अगोदर केली का असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होते आहे. केवळ शौचालयाची स्वच्छता केल्याने रुग्ण बरे होत नाहीत. त्यासाठी लागणारा निधी आणि रिक्त कर्मचाऱ्यांच्या पदभर्ती बाबत साधा कागद तरी आपण मंत्रालयात दिला काय? असाही प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.