आम्ही सरकारला सहकार्य करण्यास तयार -अशोक चव्हाण

श्री गुरू गोविंदसिंघजी शासकीय जिल्हा रुग्णालयाची बेड क्षमता वाढवा
नांदेड(प्रतिनिधी)-राज्यातील आरोग्य यंत्रणा ही सलाईनवर आहे. ठाणे पाठोपाठ नांदेडमध्ये एकाच दिवशी रुग्ण मरण पावण्याची संख्या मोठ्या प्रमाणात झाल्याची घटना समोर आल्यानंतर या पाठोपाठ आता छत्रपती संभाजीनगर, नागपूर याही भागात रुग्णांच्या मृत्यूंचा आकडा वाढत आहे अशा आपत्ती परिस्थितीत सरकारच्या सोबतीने काम करण्याची भुमिका आमची आहे. यात आम्ही काही राजकारण करणार नाही अशी भुमिका माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी घेतली आहे.


आयोजित पत्रकार परिषदे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण बोलत होते. यावेळी राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, आ.मोहन हंबर्डे, माजी मंत्री डी.पी.सावंत, माजी आ.अमरनाथ राजूरकर, माजी नगरसेवक मुन्तजिबोद्दीन, श्रावण रॅपनवाड यांची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी अशोक चव्हाण पुढे बोलतांना म्हणाले, जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सुधारायची असेल तर श्री.गुरू गोविंदसिंघजी शासकीय जिल्हा रुग्णालयाच्या बेडची क्षमता वाढवून ती 500 बेडपर्यंत न्यावी. याच बरोबर जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांना उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्यावा जेणे करून नांदेड शहरात येणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होईल. याचबरोबर शासकीय रुग्णालय चालवत असतांना सरकारला निधीची कमतरता पडत असेल किंवा त्यांना औषध पुरवठा वेळेत करता येत नसेल तर त्यांनी अशा रुग्णालयाचे खाजगीकरण करून हे रुग्णालय सुरू करावेत मात्र जनतेच्या जिवनाशी शासनाने खेळू नये. शासनाला काय करायचे आहे ते त्यांनी करावे आणि सुविधा द्याव्यात अशी भुमिका चव्हाण यांनी व्यक्त केली. आतापर्यंत 41 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अजूनही काही रुग्ण गंभीर स्वरुपात रुग्णालयात उपचार घेत आहेत. या ठिकाणी मनुष्यबळाचा अभाव आहेे. पण याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी मी चर्चा करून शहरातील खाजगी डॉक्टर्स, नर्स व औषध पुरवठा याबाबतची चर्चा करून कोवीड काळात ज्या पध्दतीने सेवा दिली होती. त्या पध्दतीनेही अशा काळात सेवा देता येईल का याचा विचार केला जावा या संदर्भात लवकरच जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सध्याचे विष्णुपूरी येथील रुग्णालय 500 खाटांचे आहे. मात्र या ठिकाणी 1200 च्या वर रुग्ण उपचार घेतात. जिल्हा रुग्णालयाच्या बाबतीत 100 खाटांवरून 300 खाटांवर नेण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला होता मात्र सरकार बदलल आणि निर्णयही यबदला आता हेच रुगणालय 500 खाटांच कराव. या ठिकाणी मोठ्या प्रमातणात जागाही उपलब्ध आहे. जेणे करून नांदेड शहरातील रुग्णांना या रुग्णालयाचा लाभ होईल आणि विष्णुपूरी येथील रुग्णालयाचा ताण कमी होईल. युवक कॉंगे्रसच्या माध्यमातून आता पर्यंत आम्ही 4.50 लाख रुपयांच्या औषधांचा पुरवठा केला आहे. हा पुरवठा यापुढेही असाच सुरू राहिल यासाठीही आम्ही प्रयत्नशिल आहोत. यासाठी शासनाने यावर काही तरी कायमस्वरुपी निर्णय घेणे गरजेचे आहे. केवळ ही परिस्थिती नांदेडपुर्तीच मर्यादीत नसून राज्यात दिवसेंदिवस ही परिस्थिती वाढत चालली आहे. अगोदर ठाणे, त्यानंतर नांदेड आता छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या शहरातही रुग्णांच्या मृत्यूची संख्या वाढत आहे. शासनाने याबाबत लवकर निर्णय घेण्याची गरज असल्याचे त्यांनी व्यक्त केले.
जतनेची दिशाभुल करण्याचे काम शासनाने बंद करावे-ना.वडेट्टीवार

ट्रिपल इंजन असणाऱ्या शिंदे सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यातच ताळमेळ नाही. एकीकडे जनतेची दिशाभुल करायची, खोट बोल पण रेटून बोल अशी मानसिकता यास शासनाची आहे. नांदेडसह राज्यातील सर्वच शासकीय रुग्णायात औषधांचा तुटवडा आहे. काल नांदेडमध्ये मंत्री महोदयांनी मुबलक प्रमाणात औषध उपलब्ध असल्याची माहिती दिली. मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी औषध उपलब्ध नसल्याची माहिती आज मी जाणून घेतली. यामुळे शासनाने जनतेची दिशाभुल करण्याचे काम बंद करावे असा खोचक टोला विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत लगावला.
राज्यात 25 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहेत. मात्र यातील 5 महाविद्यालयात कायम स्वरुपी अधिष्ठाता हे पद आहे. बाकी उर्वरीत 20 महाविद्यालयात हे पदे प्रभारी आहेत. याचबरोबर याठिकाणची मनुष्यबळ संख्याही मोठ्या प्रमाणात रिक्त आहे अशीच परिस्थिती राज्यातील इतरही ठिकाणी आहे. या ठिकाणच्या आयसीयुमध्ये केवळ दोन नर्स एक पाळीवर काम करत असतात. या ठिकाणी 500 खाटाची क्षमता असलेल्या रुग्णालयात 1000 ते 1200 रुग्ण उपचार घेतात. एकीकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्लीच्या दौऱ्यावर जातात. त्यांना नांदेड येथे येण्यास वेळ नाही. एवढेच नसून सध्याच्या सरकारला आमदार पुरविण्यासाठी व आमदार पोषण्यासाठी भरपूर वेळ आहे. मात्र रुग्णालयातील सुविधेसाठी किंवा औषध पुरवठा करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. हाफकीन या संस्थेला औषध पुरवठा करण्यासाठी कोट्यावधी रुपये दिले होते. मात्र टेंडर निघत नाही म्हणून औषध पुरवठा केला जात नाही. तर दुसरीकडे आनंदाचा शिधा देण्यासाठी सरकार कधी टेंडर काढते हे मात्र कळण्यास मार्ग नाही. मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या कुटूंबियांना प्रत्येकी 10 लाखांची मदत द्यावी अशी मागणी आम्ही राज्य सरकारकडे करणार आहोत. चौकशी समिती नेमली आहे. पण ठाणे येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील मृत्यू प्रकरणी चौकशी समिती गठीत केली होती. या समितीने कोणता अहवाल दिला तशाच प्रकारचा अहवाल दाबण्याचे काम या समितीकडून केल जाईल अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *