नांदेड(प्रतिनिधी)-स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपिय उपक्रमांतर्गत मेरी माटी मेरा देश, अभियान राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत या अगोदर शिला फलक उभारणे, वसुधा वंदन, स्वातंत्र्यसैनिक व विरांना वंदन, पंचप्राण शपथ घेणे व हर घर तिरंगा सारखे उपक्रम राबविण्यात आलेले आहेत.
अभियानाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये अमृत कलश यात्रेचा समावेश असून सदर उपक्रमांमध्ये शहरातील विविध प्रभागामधील घरा-घरातून माती/तांदूळ घेऊन त्यातून शहराचा प्रातिनिधिक कलश तयार करण्यात येणार आहे. सदरील उपक्रमांतर्गत या अगोदर दिनांक 20, 21 व 25 सप्टेंबर 2023 रोजी शहराच्या सहा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत अमृत कलश यात्रा काढून विविध घरांमधून माती/तांदूळ गोळा करण्यात आलेली आहे. सदरील सहा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत गोळा करण्यात आलेली माती/तांदूळ यांचा एकत्रित कलश तयार करण्या करिता सहा क्षेत्रीय कार्यालयाकडून रॅली दि. 5 ऑक्टोबर 2023 रोजी काढण्याचे नियोजित आहे. याच दिवशी दुपारी 12.00 वाजता महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून उत्सवाच्या वातावरणामध्ये सदरील सहा कलशांमधील माती एकत्रित करण्याचे नियोजित आहे. महानगरपालिके अंतर्गत सहा क्षेत्रीय कार्यालय जसे तरोडा, अशोक नगर, गणेश नगर, वजीराबाद, इतवारा आणि सिडको तर्फे शहरातील विविध भागातून रॅली काढून महानगरपालिकेच्या मुख्य इमारत येथे जाण्याचे नियोजित आहे.देश स्वाभिमान जोपासण्याच्या या कार्यक्रमांमध्ये शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या वतीने करण्यात येत आहे.
