नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्याचे सरकार हे खुनी सरकार आहे. सरकारच्या बेपर्वाहीमुळेच राज्यातील कळवा, छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि नागपूर या रुग्णालयांमध्येे झालेले मृत्यू घडले आहेत असे प्रतिपादन राज्यातील विरोधी पक्ष नेते शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटातील आमदार अंबादास दानवे यांनी केले.
नांदेड येथे मृत्यूचे तांडव घडल्यानंतर अनेक नेते नांदेडला आलेले आहेत. त्यात आज सकाळी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे नांदेडला आले होते. सर्वप्रथम त्यांनी कांकाडी येथील मरण पावलेल्या विजयमाला कदम या महिलेच्या घरी भेट देवून त्यांचे सांत्वन केले. वेळेवर शस्त्रक्रिया न झाल्याने विजयमाला आणि त्यांचे मुल दोघांचाही मृत्यू झाला आहे. त्या दिवशी डॉक्टर मंडळी कोणाच्या तरी वाढदिवसात व्यस्थ होती. म्हणून सकाळी 7 वाजता रुग्णालयात आलेल्या विजयमालावर रात्री 3 वाजता शस्त्रक्रिया झाली. विजयमालाच्या उपचारासाठी त्यांच्या कुटूंबियांनी बाहेरुन 70 हजार रुपयांच्या औषधी खरेदी केल्याच्या पावत्या अंबादास दानवे यांनी दाखवल्या.
नांदेडमध्येच नव्हे तर राज्यभरात औषधांचा तुटवडा आहे. नांदेडमध्ये 14 वॉर्मर आहेत.त्यामध्ये 65 बालकांचा ठेवले आहे हा जुगार आहे. तरीपण डॉक्टर प्रयत्न करत आहेत. बाहेरुन औषधी आणल्याबद्दल डॉक्टरांशी चर्चा केली तेंव्हा डॉक्टर्स त्यांना म्हणाले की, आमच्यासमोर रुग्ण मरणाच्या वाटेवर आहे, आमच्याकडे औषधी उपलब्ध नाही तर आम्ही बाहेरुन आणायला सांगितली त्यात आमचे काय चुकले. राज्यातील मुख्यमंत्री एक बोलतात, मंत्री दुसरे बोलतात, त्यामुळे खरे कोण आणि खोटे कोण बोलत आहेत हे कळतच नाही. डीन हे डॉक्टर्स घडवतात ते त्यांचे पालक आहेत. त्यांच्यासोबत करण्यात आलेल्या चुकीच्या वर्तनाबद्दल मी निषेध व्यक्त करतो. या प्रकरणात सुध्दा हेमंत पाटलांसोबत सर्व सामान्य नागरीकासारखा किंबहुना सर्वसामान्य आरोपीसारखा व्यवहार पोलीस प्रशासन करील काय? हे दिसेलच.

मुख्यमंत्र्यांना हिरो-हिरोईनसोबत फोटो सेशन करण्यात रस आहे. राज्यात मृत्यूचे तांडव सुरू आहे. त्याबद्दल त्यांना काही देणे-घेणे नाही त्यांना तर दर आठ दिवसांना दिल्लीला जावून नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना मुजरा करावा लागतो. त्यामुळे त्यांचे सरकारवर लक्षच नाही. पालकमंत्री नांदेडला फक्त ध्वजारोहणासाठीच येतात असे दिसते. पालकमंत्र्याने विहित मुदतीत शासकीय रुग्णालयाला भेट दिली. तर डॉक्टर्स कसे काम करणार नाहीत. इतर सेवक कसे काम करणार नाही असा प्रश्न अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रात 700 कोटीचा आनंद शिधा बाबत कोणतीही निविदा काढण्यात आली नव्हती. सोबतच तो शिधाा वाटला गेला की नाही याचेही काही गणित नाही. महाराष्ट्राच्या शासकीय रुग्णालयांना हाफकीन ही संस्था औषधी पुरवठा करते. ती संशोधन करणारी संस्था आहे. त्यांचे कोट्यावधी रुपये दिले नाहीत त्यामुळे मागील वर्षात मागणी केलेल्या औषधी अद्याप आलेल्या नाहीत तर आता नवीन वर्षाचे काय? डीपीसीने 4 कोटी रुपयांचा निधी दिला होता. पण तो शासकीय स्तरावरील लालफितीत अडकून पडल्याने ते पैसे सुध्दा आले नाहीत. शासकीय रुग्णालयांमध्ये दलाल, धंदेवाले, टक्केवारीवाले यांचा मोठा जमाव जमल्यामुळे रुग्णांचे मोठ्याप्रमाणात जीव जात आहेत असे अंबादास दानवे यांनी सांगितले.याप्रसंगी सुहास सावंत, माजी खासदार सुभाष वानखेडे, बंडू खेडकर, प्रकाश मारावार, माधव पावडे, वच्छलाबाई पुयड आदींची उपस्थिती होती.
