
नांदेड(प्रतिनिधी) – येथील डॉ शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयाला अपातकालीन मदत करण्यासाठी सचखंड गुरुद्वारा तयार असून याबाबत गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष सरदार डॉ विजय सतबीरसिंघ यांनी जिल्हा प्रशासनामार्फत रुग्णालयाला विचारणा केली आहे.
येथील डॉ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये नवजात बालकांसह इतर रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण अचानक वाढले. मागील तीन दिवसांपासून मृत्यूचा या रुग्णालयात तांडव सुरु आहे. अशावेळी रुग्णालयास आपत्कालिक आवश्यक ती मदत करण्याची भूमिका गुरुद्वारा बोर्डाने घेतली असून रुग्णालयाच्या मागणीनुसार औषधी सामुग्री उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत अशी माहिती गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक सरदार ठाणसिंघ बूंगई यांनी दिली.
गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष सरदार डॉ विजय सतबीरसिंघ यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याशी संपर्क साधला आहे. रुग्णालयात निर्माण झालेली परिस्थिती गंभीर असून यासाठी मानवतेची सेवा म्हणून सेवा गुरुद्वारा देण्यास तयार असल्याचे सांगितले. रुग्णालयाच्या गरजेनुसार मेडिसिन उपलब्ध करुन दिले जाणार आहेत..
24 तासात 24 रुग्ण मृत्यूमुखी पडले. रुग्ण मृत्यूमुखी पडण्याचे हे प्रमाण वाढत जात पुढील 24 तासात ही संख्या एकेचाळीस पर्यंत पोहोंचली. अशावेळी निर्माण झालेल्या भयानक परिस्थितीत गुरुद्वारा बोर्डाने मदतीचा हात पुढे केला आहे.
