
नांदेड(प्रतिनिधी)-खा.हेमंत पाटीलवर गुन्हा दाखल झाल्यानंतर आलेल्या वेगवेगळ्या फुग्यांच्या दबावामुळे काल रात्री अधिष्ठाता डॉ.शाम वाकोडे आणि बालरोग तज्ञ विभागातील प्रमुख या दोघांविरुध्द एका व्यक्तीने दिलेल्या तक्रारीनंतर भारतीय दंड संहितेच्या कलम 304 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदेड, कळवा ठाणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या गावांमधील शासकीय रुग्णालयांमध्ये मृत्यूने वणवा पेटवला आणि त्यानंतर त्या मृत्यू झालेल्यांच्या मड्यांवर राजकारण सुरू झाले. या राजकारणात चार जिल्ह्याचे खासदार हेमंत पाटील हे 3 ऑक्टोबर रोजी रुग्णालयास भेट देण्यासाठी गेले आणि त्यांनी चक्क डीन डॉ.शाम वाकोडे यांच्या हातात झाडू देवून स्वत: पाण्याचा पाईप आल्या हातात घेवून त्यांना संडास साफ करायला लावला. डॉ.वाकोडे हे अनुसूचित जमातीचे व्यक्तीमत्व आहेत. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे ते पालक आहेत. साफसफाईचे काम करण्याची जबाबदारी त्यांचीच आहे काय? की, त्यांनी लोकांचे जिव वाचवावेत असे अनेक प्रश्न त्यावेळी उपस्थित झाले. 61 वर्ष वय असलेल्या डॉ.शाम वाकोडेची ही बेईज्जतीच होती. त्यामुळे त्यांनी 3 तारखेच्या रात्री मंत्री महोदय गेल्यानंतर पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथे दिलेल्या तक्रारीवरुन हेमंत पाटील आणि इतर 10 ते 15 सहकाऱ्यांविरुध्द भारतीय दंड संहिता आणि ऍट्रॉसिटी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला.
यानंतर हेमंत पाटील यांच्या चाहत्यांनी ऍट्रॉसिटीचा गुन्हा खोटा आहे. त्यांनी सुध्दा सफाई केली असे दाखवत. डीन डॉ.शाम वाकोडेविरुध्द मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी फुग्यातली हवा बनवली. आम्ही हेमंत पाटलांचे समर्थक आहोत असे बॅनर विविध संकेतस्थळावर प्रसिध्द केले. त्यानंतर कुरूळा ता.कंधार येथील कामाजी मोहन टोम्पे (40) यांनी 4 ऑक्टोबर रोजी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची गरोदर मुलगी 30 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता सरकारी दवाखाना विष्णुपूरी येथे प्रसुतीसाठी आणली होती. दि.1 ऑक्टोबर रोजी रात्री 1 वाजेच्या सुमारास त्यांची नॉर्मल प्रसुती झाली आणि त्यांनी एका मुलीला जन्म दिला. डॉक्टरांनी त्यावेळी माझी मुलगी आणि तिची मुलगी दोघांची तब्बेत चांगली असल्याचे सांगितले. 1 ऑक्टोबरची पहाट झाल्यानंतर बाळाची तब्येत बिघडली आहे असे सांगून डॉक्टरांनी रक्तपेशींचे पॉकिट व इतर औषधी बाहेरून आणण्यास सांगिेतले. पण त्यावेळी कोणी डॉक्टर तेथे हजर नव्हता. मी डीन डॉ.वाकोडे यांना भेटलो. त्यांनी ताबडतोब डॉक्टर पाठवतो असे सांगितले. पण त्यांनी मला जाणून बुजून तेथेच बसून ठेवले. कोणतीही नर्स, डॉक्टर्स बालिकेकडे गेले नाहीत. डीन डॉ.शाम वाकोडे यांनी माझ्या मुलीचे बाळ मरणाच्या दारात असतांना तिला औषध उपलब्ध करून दिले नाही म्हणून 2 ऑक्टोबर रोजी माझ्या मुलीच्या मुलीचा मृत्यू झाला. त्यानंतर माझी मुलगी आज सकाळी अर्थात 4 ऑक्टोबर रोजी मरण पावली. मी बाहेरून रक्ताचे व औषधांचे 45 हजार रुपये खर्च करून साहित्य आणले होते. माझ्या मुलीचा आणि तिच्या मुलीच्या मृत्यूचा जबाबदार डॉ.शाम वाकोडे आहेत असे या तक्रारीत लिहिले आहे.

या तक्रारीनंतर नांदेड ग्रामीण पोलीसांनी डीन डॉ.शाम वाकोडे आणि शिशुंचे उपचार करणारे प्रमुख डॉक्टर अशा दोघांविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 304, 34 नुसार गुन्हा क्रमांक 705/2023 दाखल केला असून या गुन्ह्याचा तपास पोलीस सुरू आहे. रुग्णालयात मृत्यूंचा वणवा पेटल्यानंतर आज पर्यंत अनेक नेते मंडळींनी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात भेटी देवून त्या रुग्णालयाला पर्यटन स्थळ बनवले. प्रत्येक जण आप-आपल्या परीने बोलत आहे. डॉक्टर्स सांगतात की, एखादा रुग्ण औषधाअभावी मरणाच्या वाटेवर असेल त्यावेळी आम्ही आमच्याकडे उपलब्ध नसलेली औषधी बाहेरून आणण्यास सांगितले तर त्यात आमचे काय चुकले.याबाबीकडे कोणीच पाहत नाही. याच डॉक्टरांना कोरोना काळात तुम्ही आमचे देव आहात अशा उपाध्यांनी त्यांचा सन्मान करण्यात आला. काल डॉक्टरांनी केलेल्या धरणे आंदोलनात त्यांच्या हातातील पाटी सांगत होते की, देव नको फक्त माणुस म्हणून आमच्यासोबत वागा याचे काहीच उत्तर कोठेच नाही.
सर्वात मोठा प्रश्न डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या सफाईची निविदा कोणाला मिळालेली होती. त्याचे कोणी नावच घेत नाही.सुरू असलेल्या निविदेेप्रमाणे काम का होत नाही. हे पाहण्यासाठी जबाबदार कोण आहे. याची तपासणी होणे आवश्यक आहे. आणि ज्या घाण संडासला पाहुन खा.हेमंत पाटील यांना राग आला त्याच संडासमध्ये रुग्ण आणि रुग्णाचे नातेवाईक आपल्या रुग्ण काळातील कामकाज चालवत होते. मग सफाई करण्याचे कंत्राट कोणाला देण्यात आले होते. याचा शोध घेवून त्याच्याविरुध्द ही गुन्हा दाखल होण्याची गरज व्यक्त होत आहे.
