
नांदेड (प्रतिनिधी)- आरोग्य आणि शिक्षण हे दोन विषय राज्यात सर्वात महत्वाचे विषय असताना खोके सरकार इतरांवर ईडी चौकशी, सीबीआय चौकशी, आणि पक्ष फोडणे यामध्ये त्यांना शासन चालविण्यामध्ये वेळेच नसते म्हणून अशा प्रकारे राज्यात मृत्यूचा वणवा पेटला आहे. यामुळे मी राज्य सरकारविरूद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी प्रयत्न करणार आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
नांदेडमध्ये मृत्यूंचा वणवा पेटल्यानंतर विशेष करून नेत्यांनी नांदेडला भेट दिली. त्यात आज खासदार सुप्रिया सुळे नांदेडला आल्या होत्या. सर्वप्रथम त्यांनी शासकीय रूग्णालयात भेट दिली आणि तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. सुप्रिया सुळे यांनी ज्यांचे शिशू मरण पावलेत अशा मातांची भेट घेतली. आणि त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. त्यांच्यासोबत डॉ. सुनील कदम, माजी आ. प्रदीप नाईक यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, खोक्यांमध्ये बुडलेेले महाराष्ट्र सरकार इतरांच्या ईडी चौकशी, सीबीआय चौकशी, इनकम टॅक्स चौकशी आणि इतर राजकीय पक्ष फोडण्यातच व्यस्त असल्यामुळे त्यांना सरकार चालविण्यात वेळ नाही. दवाखान्यात असलेले कमी मनुष्यबळ, उपलब्ध नसलेल्या औषधी आणि त्यामुळे घडलेला मृत्यूंचा वणवा याबाबतची जबाबदारी शासनाची असते. शासनाच्या वागण्याप्रमाणे महाराष्ट्रात गरीबांनी जगायचे नाही काय, असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. सध्याच्या परिस्थितीत राज्य आणि देश अत्यंत अस्थिर अवस्थेतून चालत आहे. अशा परिस्थितीत इतरांना काहीही बोला, इतरांच्या चौकशा लावा पण सर्वसामान्य गरीब माय-बाप जनतेचे प्राण वाचवा असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
माझी भारतीय जनता पार्टीसोबत वैचारीक लढाई असून वैयक्तीक नाही. महाराष्ट्रात मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाला या सरकारने दाखविलेले गाजर महत्वपूर्ण आहे. हे सरकार शाळा विकत आहे, रूग्णालयेही विकतील म्हणूनच शिक्षण आणि आरोग्य या महत्वाच्या विषयांवर खोके सरकार बेपरवाह आहे, असे सुळे म्हणाल्या. आईचे दु:ख जाणुन घेण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना वेळ नाही. कारण त्यांना दिल्लीत फेऱ्या माराव्या लागतात. म्हणून राज्याचे शासन चालवायला वेळच नाही. पुढे येणाऱ्या कोणत्याही समस्येबाबत सरकारमध्ये समन्वयाचा अभाव आहे आणि म्हणूनच देशात आणि राज्यात चाललेली दडपशाही सांगताना सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांचा विषय सांगितला. नांदेड येथील अधिष्ठाता डॉ. श्याम वाकोडे यांच्यासोबत झालेल्या वागणुकीबद्दल बोलताना दुर्देवी घटना असा उल्लेख सुप्रिया सुळे यांनी केला. मी राज्य सरकारविरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी प्रयत्न करणार आहे, तसेच आरोग्य विभागातील संबंधित मंत्र्यांनी राजीनामा द्यावा यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
