नांदेड(प्रतिनिधी)-ऍट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर सुध्दा खा.हेमंत पाटील यांना अटक होत नाही या संदर्भाचे निवेदन युवा पॅंथर संघटना प्रमुख राहुल एस.एम.प्रधान यांनी राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग नवी दिल्ली यांना पाठवले आहे. सोबतच नांदेडच्या शासकीय रुग्णालयाबाहेर सहयोग या नावाने रुग्णांसाठी तयार केलेल्या औषधी केंद्रे, तपासणी केंद्रे यांच्यावर सुध्दा कार्यवाही व्हावी. तसेच या सहयोग नावाचे सर्व कारभार नरसिंग हंबर्डे यांचे आहे. नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे यांचे ते नातलग आहेत अशी माहिती राहुल प्रधान यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूचा वणवा पेटल्यानंतर अनेक नेत्यांनी यात आप-आपल्या परिने काय चुकले आहे, काय व्हायला पाहिजे होते. काय झाले आहे या संदर्भाने वेगवेगळी वक्तव्य केली. आज युवा पॅंथरचे प्रमुख राहुल प्रधान यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी प्रसेनजित वाघमारे हे उपस्थित होते.
राहुल प्रधान पुढे सांगत होते की, रुग्णांची परिस्थिती राज्यात भयावह झाली आहे. गरीब व्यक्तीला सर्व काही मोफत मिळते म्हणून तो शासकीय रुग्णायलयात येतो. परंतू या रुग्णालयात सहयोग या संस्थेचे अनेक एजंट फिरतात. औषधी आणणे, तपासण्या करणे, रक्त पुरवठा अशा अनेक वैद्यकीय गरजांचे हे लुट केंद्र सुरू आहे. या सहयोगचे मालक नरसिंग हंबर्डे हे आहेत. यावर बंदी आणण्याची गरज आहे. काल दि.5 ऑक्टोबर पासून शासकीय रुग्णालयातून सहयोगकडे चिठ्या जाणे बंद झाले आहे. पण हे कायमचे बंद झाले पाहिजे अशी अपेक्षा आहे. नांदेड शासकीय रुग्णालयात उपलब्ध असलेल्या संसाधनांची कमतरता, कमी असलेले मनुष्यबळ, औषधींची कमतरता, हा सर्व भाग म्हणजे सरकारचे अपयश आहे. सरकारच्या प्रगतीचा हा खोटारडा बुरखा या मृत्यूच्या वणव्याने समोर आला आहे.
आपल्या सत्तेच्या मस्तीतून खासदार हेमंत पाटील यांनी लोकांच्या मरणाची चिंता करण्यापेक्षा अधिष्ठाता डॉ.शाम वाकोडे यांच्या मार्फत संडास साफ करण्यामध्ये रस दाखवला. खा.हेमंत पाटील यांनी स्वत:च असाही प्रचार केेला की, मी असला प्रकार पहिल्यांदा केला नाही. तर ऑक्टोबर 2008 मध्ये तत्कालीन अधिष्ठाता शासकीय रुग्णालय यांच्यासोबतपण केला होता. योगा-योगाने त्यावेळचे अधिष्ठाता सुध्दा डॉ.वाकोडे नावाचेच व्यक्ती होते. ऍट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला असतांना पोलीसांनी अद्याप हेमंत पाटील यांना का अटक केली नाही. असा प्रश्न उपस्थित करून मी त्या संदर्भाने राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाला निवेदन पाठवले आहे. त्यात हेमंत पाटील यांची लोकसभा सदस्यता रद्द करून त्यांना लवकरात लवकर अटक करण्याचे आदेश नांदेडचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांना करावे अशी मागणी केली आहे. सोबतच खा.हेमंत पाटील मी जामीन घेणार नाही असे सांगून न्यायालयीन प्रक्रियेला आव्हान देत आहेत. याबद्दलही राहुल प्रधान यांनी आश्चर्य व्यक्त केले. संसदेत खासदार पदाची शपथ घेतांना त्या शपथेमध्ये एक वाक्य आहे की, मी कोणत्याही व्यक्तीला व पशुला इजा करणार नाही. डॉ.शाम वाकोडेसोबत त्यांनी केलेले कृत्य म्हणजे संसदेत घेतलेल्या शपथेची पायमल्ली आहे अशा शब्दा राहुल प्रधान यांनी निषेद व्यक्त केला. विविध प्रसार माध्यमांमध्ये दोन समाजात तेढ निर्माण होईल असे पोष्ट प्रसारीत करून समाजात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. म्हणूनच हेमंत पाटील यांना या प्रकरणात त्वरीत अटक होणे गरजेचे आहे असे राहुल प्रधान म्हणाले.