नांदेड(प्रतिनिधी)-जिल्ह्यासह राज्यातील आरोग्य सेवेची लकत्तरे अक्षरशा: वेशीवर टांगल्यानंतर आणि न्यायालयाने राज्य सरकारचे कान टोचल्यानंतर शासनाला खडबडून जाग आली. गेल्या अनेक वर्षापासून धुळखात पडलेला प्रस्ताव शुक्रवारी राज्य शासनाकडे सादर झाला. यावर आता कार्यवाही कधी होईल याकडे नांदेड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात नांदेड शहरातील श्री गुरू गोविंदसिंघजी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे 100 खाटांवरून 300 खाटात श्रेणीवर्धन करून तत्कालीन पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी मंजुरी मिळून घेतली होती. मात्र सत्तांतर झाल्यानंतर हा विषय धुळ खात पडला. अनेकदा हा प्रस्ताव राज्य शासनाच्या निर्दशनास आणून देण्यात आला होता. मात्र राजकीय घडामोडीमुळे अशा कामांकडे दुर्लक्ष झाले. नांदेड जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती पाहता राज्यात सर्वात मोठा जिल्हा म्हणून याकडे बघता येईल. 16 तालुके आणि दोन राज्यांच्या सिमा या जिल्ह्याला लागून आहेत. याच बरोबर मराठवाड्यातील दोन नंबरचे शहर म्हणून नांदेड शहराकडे बघीतल जात. कै.डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या ठिकाणी 500 खाटाचे रुग्णालय सुरू आहे. मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. या रुग्णालयाचा भार कमी व्हावा म्हणून शहरातील मध्यवस्तीत असणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयात खाटांची संख्या वाढून या ठिकाणीच शहरातील व बाहेरुन येणाऱ्या काही भागातील रुग्णांना दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी 100 खाटांवरून 300 खाटांना तत्कालीन पालकमंत्र्यांनी मंजुरी दिली होती आणि हा प्रस्ताव राज्य शासनाची मंजुरी मिळण्यासाठी मंत्रालयात पाठवला होता. मात्र राज्यातील सरकार बदलल्यानंतर हा प्रस्ताव तसाच धुळखात पडला.
मागील काही दिवसांपासून शासकीय रुग्णायलातील मृत्यूची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला. ऐवढेच नसून न्यायालयालाही यात सहभाग घ्यावा लागला आणि राज्य शासनाचे कान टोचावे लागले. यात महाविकास आघाडी सरकारने श्रेणी वर्धन करून मंजुर केलेल्या 300 खाटांचे श्री गुरू गोविंदसिंघजी जिल्हा सामान्य रुग्णालय आता 500 खाटांचे करण्याचा प्रस्ताव शुक्रवारी शासनाला सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावावर शासनाने तात्काळ कार्यवाही करून लवकरात लवकर नांदेड येथील जिल्हा सामान्य रुग्णालय पुर्ण क्षमतेने सुरू करावे अशी मागणी आता नांदेडकरांमधून होत आहे.
श्री गुरू गोविंदसिंघजी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या 500 खाटांचा प्रस्ताव शासनाकडे सादर