
नांदेड(प्रतिनिधी)-खासदार हेमंत पाटलांवर झालेला ऍटॉसिटी कायद्याचा गुन्हा खोटा असल्याचे जन आक्रोश मोर्चातील सदस्य तथा माजी नगरसेवक श्रीकांत लक्ष्मणराव गायकवाड यांनी सांगितले.
आज जन आक्रोश मोर्चा या शिर्षकाखाली बोलवलेल्या पत्रकार परिषदेत श्रीकांत गायकवाड बोलत होते. हेमंत पाटील हे नगरसेवक होते तेंव्हापासून मी त्यांना ओळखतो त्यांनी प्रत्येक कामामध्ये माझ्या समाजासाठी मेहनत घेतलेली आहे. हेमंत पाटलांवर दाखल झालेला ऍट्रॉसिटीचा गुन्हा राजकीय दबावापोटी दाखल करण्यात आला आहे असे माझे आणि माझ्या समाजाचे मत आहे. मी एखाद्या पाटलाला धमकी द्यायची आणि ऍट्रॉसिटी करतो म्हणून पैसे काढायचे अशा संदर्भाने ऍट्रॉसिटीचा हा दुरूपयोग आहे. हेमंत पाटील हे सर्व धर्म समभाव मानणारे व्यक्ती आहेत. त्यांनी आमच्या समाजावर केलेले उपकार आम्ही विसरणार नाहीत. हेमंत पाटील दोषी असतील तर आम्हाला फाशी द्या आम्ही त्यांचे गुन्हेगार आहोत.मी त्या दिवशी दवाखान्यात हेमंत पाटलांसोबत असतो तर माझ्यावर ऍट्रॉसिटीचा काय परिणाम झाला असता. त्यांनी पाणी टाकले आणि डीनला झाडू मारायला लावला यात ऍट्रॉसिटी कसली? अशा पध्दतीने ऍट्रॉसिटी होणार असले तर आम्हा सर्वांना जेलमध्ये टाका. ऍट्रॉसिटी योग्य ठिकाणी वापरण्यात आली पाहिजे परंतू तीचा दुरुपयोग थांबला पाहिजे.
हेमंत पाटील यांना राजकीय जीवनातून उठविण्याचा हा प्रकार कोणत्या तरी दबाखाली झाला असून समाजाचा प्रतिनिधी म्हणून मी त्याचा विरोध करणे हे माझे कर्तव्य आहे. मी कोणाच्या सांगण्यावरून तुम्हाला बोलावले नाही. परंतू घडलेल्या प्रकाराविरुध्द जन आक्रोश मोर्चाच्यावतीने दि.11 ऑक्टोबर रोजी तिरंगा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढून आम्ही याबद्दलचा निषेध व्यक्त करणार आहोत. या प्रसंगी शासकीय रुग्णालयात मरण पावलेल्या काही नवजात शिशुंच्या कुटूंबियांना तेथे बोलावण्यात आले होते. त्यांनी सुध्दा तेथे घाण होती, सोय नव्हती, बाहेरुन मेडीकल औषधी आणाव्या लागल्या असे सांगितले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेचा चुकीच्या मार्गाने वापर करणे सुरू आहे आणि त्यासाठी हा मोर्चा प्रस्तावित करण्यात आला आहे. चुकीचा मार्ग, दबावाखाली या शब्दाला स्पष्ट शब्दात बोलतांना श्रीकांत गायकवाड यांनी हेमंत पाटील यांच्यावर दाखल झालेला ऍट्रॉसिटीचा गुन्हा खोटा असल्याचे सांगितले. सोबतच ऍट्रॉसिटीचे हत्यार उगीच काढू नका असे म्हणाले. श्री.गुरू गोविंदसिंघजी रुग्णालय असतांना सर्व काही व्यवस्थीत होते पण शासकीय रुग्णालय विष्णुपूरीला गेल्यानंतर ते सर्व बिघडले, राज्यकर्त्यांनी यावर योग्य लक्ष दिले असते तर असे प्रकार घडले नसते असे श्रीकांत गायकवाड म्हणाले. विष्णुपूरी येथील शासकीय रुग्णालयाबाहेर असलेले मेडिकल स्टोअर्स, तपासणीच्या जागा, वैद्यकीय वस्तु मिळण्याचे ठिकाण कोणाचे आहेत याचा शोध तुम्ही घ्या असे पत्रकारांना ते म्हणाले.