नांदेड (प्रतिनिधी)-वै. लक्ष्मीबाई पुराणिक स्मृती पुरस्कार वितरण सोहळा गिरीराज मंगल कार्यालय नांदेड येथे थाटात संपन्न झाला. गुणी गायिका आणि प्रथितयश संगीत शिक्षिका सौ. वर्धिनी जोशी हयातनगरकर यांना वर्ष २०२२ चा हा पुरस्कार, टी एम देशमुख, संजय जोशी, सौ. मंजुषा देशपांडे आणि सौ.प्रणाली चैतन्य देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
मानपत्र, मानधन, स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या सोहळ्याचे प्रास्ताविक करताना व मानपत्र वाचन करताना संयोजक गोविंद पुराणिक यांनी या कार्यक्रमाची पार्श्वभूमी तसेच पुरस्काराबाबतची भूमिका समजावून सांगितली. यापूर्वी हे पुरस्कार प्रसिध्द गायिका अंकीता जोशी, मुंबई, अश्विनी जोशी आडे, सारिका अपस्तंभ यांना प्रदान करण्यात आले. २०२२ चा हा पुरस्कार सौ.वर्धिनी जोशी हयातनगरकर यांना देताना आम्हाला आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले. तिचे गुरू टी. एम. देशमुख यांनी आपल्या भाषणात वर्धिनी जोशी हयातनगरकर हिच्या बालपणापासूनच्या सांगीतिक प्रवासाचा उल्लेख करुन बालपणापासूनच आवाजावर जबरदस्त प्रभाव तसेच संगीत शिक्षण आकलन करण्याची तिची क्षमता जबरदस्त असून, येणार्या काळात अशा पुरस्कारामुळे तिची निश्चित प्रगती होवो, माझ्या निष्ठावान आणि संगीताची प्रामाणिकपणे सेवा करणार्या शिष्या सौ.वर्धिनी जोशी हयातनगरकर यांचा गौरव या पुरस्काराने होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या पुरस्कार वितरण सोहळ्याचे सूत्रसंचालन जयंत वाकोडकर यांनी केले. पुरस्कार वितरणानंतर सूरमणी धनंजय जोशी यांची भक्तीरंग मैफील अतिशय रंगली. त्यांना प्रशांत गाजरे (तबला), अमोल लाकडे (पखवाज), भगवानराव देशमुख (सहवाद्ये), पंकज शिरभाते (व्हायोलिन), डॉ. प्रमोद देशपांडे (संवादिनी) इत्यादी कलाकारांनी सुरेख साथ दिली. मैफिलीचे दर्जेदार निवेदन गोविंद पुराणिक यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गिरीश देशमुख, दि. मा. देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतले. या सोहळ्यासाठी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरस्कार मिळाल्यानंतर सौ.वर्धिनी जोशी हयातनगरकर हिने आपल्या प्रतिक्रियेत बोलताना सांगितले की, अशा पुरस्कारामुळे माझा मान-सन्मान तर वाढलाच आहे. यापुढे संगीताची निःस्सिम सेवा करुन हे कार्य पुढे नेण्याचा माझा संकल्प असल्याचे तिने सांगितले.
सन्मानाचा स्व.लक्ष्मीबाई पुराणिक स्मृती पुरस्कार सौ.वर्धिनी जोशी हयातनगरकर यांना प्रदान, प्रख्यात गायक धनंजय जोशी यांचा भक्तीरंग कार्यक्रमही रंगला