अभिवक्ता संघाच्या निवडणुकीसाठी मतदार यादी अद्यावत होणार; सदस्यांना लवकरात लवकर फिस भरण्याचे आवाहन

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड अभिवक्ता संघाची द्वैवार्षिक निवडणुकीची मुदत संपल्यानंतर आता नवीन द्वैवार्षिक पदाधिकारी निवडण्यासाठी अभिवक्ता संघाच्या सदस्यांनी आपली सदस्यता फिस भरावी असे आवाहन अभिवक्ता संघाचे अध्यक्ष ऍड.सतिश पुंड, सचिव ऍड.नितीन कागणे, कोषाध्यक्ष ऍड.पांडूरंग अंबेकर यांच्या स्वाक्षरीने निर्गमित केलेल्या पत्रात केली आहे.
नांदेड अभिवक्ता संघाची द्वैवार्षिक निवडणुक ऑगस्ट महिन्यात होत असते. आता दोन महिने जास्त झाले आहेत. त्याची कारणे काहीही असतील. परंतू नव्याने मतदार यादी प्रकाशित करण्यासाठी अभिवक्ता संघाच्या सदस्यांनी आपली सदस्यता फिस भरणे आवश्यक आहे. सभासदत्व वर्गणी 480 रुपये किंवा आजीवन सदस्यत्व वर्गणी 5000 रुपये भरावी लागते.
यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व वकील सदस्यांना आवाहन केले आहे की, बॅंक ऑफ इंडिया शाखा संतकृपा मार्केट येथील खाते क्रमांक 065020110000 525 ज्याचा आयएफएससी कोड बीकेआयबी 0000650 या खात्यावर किंवा मोबाईल बॅंकींग, युपीआयद्वारे किंवा क्युआरकोड स्कॅन करून दि.25 ऑक्टोबर 2023 पर्यंत आपली सदस्यत्व वर्गणी जमा करावी. तसेच युटीआर नंबर दाखवून पावती प्राप्त करावी किंवा रोख रक्कम अभिवक्ता संघाचे कोषाध्यक्ष ऍड.पांडूरंग अंबेकर यांच्याकडे जमा करून पावती प्राप्त करावी. या निवडणुकीत सर्व वकील सदस्यांनी वन बार वन वोटचे शपथपत्र व स्वयंघोषणापत्र जिल्हा अभिवक्ता संघाकडे जमा करावे. वन बार वन वोटचे शपथपत्र आणि स्वयंघोषणापत्र दाखल न करणाऱ्या वकील संघटनेच्या सदस्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट केले जाणार नाही. सदस्यांच्या सोयीसाठी संघटनेने क्युआर कोड स्टीकर न्यायालय परिसरात अनेक जागी चिटकवले आहे. त्याचा उपयोग करून लवकरात लवकर सदस्यता फिस जमा करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *