
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड पोलीसांनी बक्षीस जाहीर केलेला गब्या आणि त्याच्या एका साथीदाराला छत्रपती संभाजीनगर शहर येथील गुन्हा शाखेने पकडले आहे. त्याच्याविरुध्द भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम प्रमाणे मुकूंदवाडी येथे गुन्हा दाखल झाला असून सध्या तो मुकूंदवाडी पोलीसांच्या ताब्यात आहे.
नांदेड जिल्हा पोलीस दलाने काही दिवसांपुर्वीच शहरात आणि जिल्ह्यात समाजात अशांतता पसरविणारे आशिष सपुरे आणि रबज्योतसिंघ उर्फ गब्या या दोघांची माहिती देणाऱ्या बक्षीस जाहीर केले होते. दि.10 ऑक्टोबर रोजी औरंगाबाद गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरिक्षक विशाल बोडके, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक सतिश जाधव, पोलीस अंमलदार संजयसिंह राजपुत, राहुल खरात, संदीप राशीनकर, तातेराव शिनगारे आणि संदीप तायडे हे गस्त करत असतांना त्यांना मिळालेल्या माहितीनुसार नांदेड जिल्ह्याला हवा असलेला गुन्हेगार सिडको येथील एन-2 भागातील गणेश एक्झीकेटीयु या लॉजच्या रुम क्रमांक 201 मध्ये थांबलेला आहे. छत्रपती संभाजीनगर पोलीसांनी संपुर्ण कायद्याची प्रक्रिया पुर्ण करून तेथे छापा टाकला. त्या ठिकाणी रबज्योतसिंघ उर्फ गब्या जसविंदरसिंघ तिवाणा (23) आणि अमित शेषराव गोडबोले (23) हे नांदेडचे दोघे सापडले. त्यांच्याकडे दोन देशी बंदुका सापडल्या आणि दोन जीवंत काडतूस सापडले. त्यांच्याकडे असलेले मोबाईल, दोन अग्नी शस्त्र, दोन जीवंत काडतूस सोबत चार चाकी वाहन क्रमांक एम.एच.26 बी.एक्स.7744 ही चार चाकी गाडी मिळून 20 लाख 2 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार संदीप तायडे यांच्या तक्रारीवरुन रबज्योतसिंघ उर्फ गब्या जसविंदरसिंघ तिवाणा आणि अमित शेषराव गोडबोले विरुध्द भारतीय हत्यार कायदा कलम 3, 4, 25 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 नुसार मुकूंदवाडी छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 445/2023 दाखल करण्यात आला आहे.
