
नांदेड(प्रतिनिधी)-विष्णुपूरी येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रभारी अधिष्ठातांना शौचालय साफ करायला लावणे खा.हेमंत पाटील यांना चांगलेच अंगलट आले आहे. शुक्रवार दि.13 रोजी निषेध मोर्चा समन्वय समितीने महात्मा ज्योतीबा फुले पुतळ्यापासून भव्य निषेध मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला. यावेळी गद्दार शिवसैनिक खासदार हेमंत पाटील यांना अटक झाली पाहिजे यासह अन्य घोषणा मोर्चाकरूंनी दिल्या.
शहरातील महात्मा फुले पुतळ्यापासून सकाळी 11 वाजेच्यासुमारास विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात आदिवासी, बंजारा व अनुसूचित जाती समाजातील तसेच ऍट्रॉसिटी कायद्याला समर्थन करणाऱ्या अनेकांनी या मोर्चात सहभाग घेतला. या विशेषता: या मोर्चामध्ये अगदी 2 ते 3 वर्षाच बालकाने आपल्या आईच्या कडेला बसून आपली उपस्थिती दर्शवली.याच बरोबर या मोर्चात मोठ्याप्रमाणात महिलाही सहभागी झाल्या होत्या. खा.हेमंत पाटील यांना अटक झाली पाहिजे,ऍट्रॉसिटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. यासह अन्य काही मागण्या घेवून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाला. विशेषता: या मोर्चाच्या बंदोबस्तासाठी पोलीस फौजफाटाही मोठ्याप्रमाणात तैनात करण्यात आला होता. अनेक मोर्चकरुंनी तर खा.हेमंत पाटील आमच्या जीवावर खासदार झाले, आम्ही बाहेरचा उमेदवार असतांनाही बहुमताने मतदान दिलं. मतदान देवून आम्ही पाप केल का? असा प्रश्नही या मोर्चात अनेक मोर्चाकरूंनी विचारला? हेमंत पाटील यांना अटक झालीच पाहिजे, खासदारकी रद्द झालीच पाहिजे यासह अन्य घोषणांनाही मोर्चाकरुंनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकल्यानंतर मागण्यांचे निवेदन मोर्चेकरूंनी जिल्हाधिकारी यांना दिले. तात्काळ खासदार हेमंत पाटील यांना अटक झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनाकडे केली आहे.