नांदेड (प्रतिनिधी)-शासन सर्व कामे कंत्राटी पद्धतीने करून घेते तर हे सर्वेक्षणाचे अशैक्षणिक काम शिक्षकांच्या माथी मारण्याचे कारण काय? सर्व शिक्षक संघटनेच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांनी नवसाक्षर भारत सर्वेक्षणावर बहिष्कार घातला असताना ; राज्याचे उपसंचालक क्षीरसागर यांनी नांदेड जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची जि.प.नांदेड येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात बैठक घेऊन, सर्वेक्षणावरील बहिष्कार मागे घेण्याची विनंती केली होती . पण उपस्थित सर्व शिक्षक संघटनेच्या वतीने तीव्र बहिष्कार असल्याचे सभागृहात जाहीर केले होते.
त्यानंतर राज्यात व जिल्हयात बहिष्कारचे वातावरण असताना शिक्षक संघटनांचे पदाधिकारी ऐकत नाहीत. असे समजून शासन फोडो- जोडो ही निती अवलंबून शिक्षकांना नवभारत साक्षरता कार्यक्रम कार्याच्या प्रशिक्षणासाठी निमंत्रित केले. सर्वेक्षणासंदर्भात व त्या संदर्भाच्या अनुषंगीक कार्याच्या माहितीसाठी नांदेड जिल्ह्य़ात प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने नवसाक्षर भारत सर्वेक्षणावर बहिष्कार आहे हे अनेक प्रशिक्षणातून दिसून आले . आज जिल्ह्यात सुरू असलेल्या प्रशिक्षणात बहिष्कार घालणाऱ्या मध्ये कापसी , मारतळा ता.लोहा, तरोडा ता.नांदेड ,दुगाव ता.बिलोली आदीसह जिल्हयातील अनेक संकुलात बहिष्कार कायम असल्याचे दिसले.
अशैक्षणिक काम शिक्षकांच्या माथी लावणाऱ्या प्रशासनाला असहकार्याची भावना ठेवून विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी सर्वेक्षणावर बहिष्कार कायम ठेवण्याचे आव्हान जिल्हा निमंत्रक युवराज पोवाडे, संयोजक जी.एस. मंगनाळे ,सहसंयोजक अशोक पाटील, बाबुराव फसमले, तसलीम शेख , शंकर हसगुळे, जे.डी.कदम,जगन ढवळे,नईमोद्दीन शेख ,बाबुराव कैलासे,चंद्रकांत कुणके, एल.बी.चव्हाण, निलेश गोधणे,बाबुराव कैलासे, रवी ढगे,बळवंत मंगनाळे माधव पचलिंग, आदींनी बहिष्कार कायम असल्याचे जाहीर केले आहे.