नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड येथे कृषी महाविद्यालय स्थापन व्हावे ही मागणी अनेक वर्षापासून नांदेडकरांची होती. या मागणीला 2021 मध्ये खऱ्या अर्थाने या मागणीची दखल घेण्यात आली आणि 17 सप्टेंबर 2023 रोजी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत महाविद्यालयाची घोषणा करण्यात आली आणि 13 ऑक्टोबर 2023 रोजी या घोषणेची पुर्तता शिंदे सरकारने केली असून आता पुर्ण क्षमतेने हे महाविद्यालय येणाऱ्या काळात सुरू होणार आहे.
नांदेड येथे कृषी विद्यालय अस्तित्वात आहे. पण महाविद्यालय नव्हते. यासाठी नांदेड येथील विद्यार्थ्यांना परभणी व अन्य ठिकाणी शिक्षणासाठी जावे लागत होते. एकीकडे नांदेडची ओळख आता शैक्षणिक केंद्र म्हणून होत असतांना यात कृषी महाविद्यालयाची भर पडली. हे महाविद्यालय 2023-24 या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले. यासाठी लागणारी जमीनही कृषी विभागाकडे उपलब्ध आहे. सध्या पावडेवाडी नाका परिसरात कृषी विद्यालय आहे. याच ठिकाणी महाविद्यालय ही सुरू केल जाईल अशी माहिती प्राप्त होत आहे. या ठिकाणी 52 हेक्अर जमीन उपलब्ध आहे. याच बरोबर कापुस संशोधन केंद्र बाफना येथे 36.33 हेक्टर आणि धनेगाव येथे 17 .40 हेक्टर अशी एकूण 105.73 हेक्टर जमीन कृषी विद्यापिठाची आहे. या महाविद्यालयासाठी 30 हेक्टर जमीनीच आवश्यकता आहे. या महाविद्यालयासाठी एकूण 60 विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे. याचबरोबर 88 पदे ही मंजुर करण्यात आली आहेत. यातील काही पदांना मान्यताही देण्यात आली आहे. हे महाविद्यालय 2023-24 या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्याची मान्यता देण्यात आली आहे. महाविद्यालय सुरू झाल्याप्रकरणी आ.बालाजी कल्याणकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.
नांदेड येथे कृषी महाविद्यालय सुरू करण्याचा शासन निर्णय जारी