नांदेड पोलीस दलाने पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना दिलेली सर्वात सुंदर भेट

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलाने अंतरराष्ट्रीय स्तरावरुन व्हिएसएम कॉल व्हिओआयपी कॉलमध्ये बदलून बेकायदेशीरपणे समांतर टेलीफोन एक्सचेंज चालविणाऱ्या आणि त्यातून खंडणी मागणे, फिशींगप्रकार करणाऱ्या तीन जणांना पकडून नांदेड जिल्हा पोलीस दलाची शान वाढवली आहे. या कामात त्यांना कर्नाटक, केरळा पोलीस आणि भारतीय विमान प्राधिकरण या संस्थांनी भरपूर सहाय्य केले. एक आरोपी दुबईवरून परत आल्याबरोबर त्याला अटक करण्यात आली आहे. या कामासाठी नांदेड पोलीसांनी कर्नाटक, छत्तीसगड, केरला आदी राज्यांमध्ये मागील चार महिन्यांपासून फेऱ्या मारत हा गुन्हा उघडकीस आणला. या कामगिरीतील नांदेड जिल्हा पोलीस दलाने 10 सिमबॉक्स आणि 1 हजार सिमकार्ड जप्त केले आहेत. नांदेड जिल्ह्याने अशी कार्यवाही पहिल्यांदाच केली आहे.
आज बोलवलेल्या पत्रकार परिषदेत पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव, पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, सहाय्यक पोलीस निरिक्षक आदित्य लोणीकर, चंद्रकांत पवार यांची उपस्थिती होती.
मोबाईल फोन आल्यानंतर सुरूवातीच्या काळात त्याचे दर अत्यंत महाग होते. या दरांना कमी करण्यासाठी एक समांतर टेलीफोन एक्सचेंज चालविण्याची बेकायदेशीर बाब फसवणूक करणाऱ्यांच्या लक्षात आली आणि त्यातूनच हा प्रकार सुरू झाला. एकाच सिमबॉक्समध्ये 20 ते 1 हजार सिमकार्ड बसतात आणि त्याद्वारे व्हीएसएम कॉल (कायदेशीर कॉल) हा कॉल व्हिओआयपी(बेकायदेशीर कॉल)मध्ये बदलून आपण फसवलेल्या ग्राहकाला कमी दरात विदेशात बोलण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा बेकायदेशीर व्यवसाय पुढे आला. त्यानंतर याच व्हिओआयपी कॉलद्वारे सामाजिक संकेतस्थळांवरुन व्यक्तींची माहिती घेवून त्यांना एका मिनिटात 20 ते 25 फोन वेगवेगळ्या सिमवरून केले जाण्याचा व्यवसाय पुढे आला. त्यातून खंडणी मागणे, फिशींग करणे असे व्यवसाय उदयाला आले आणि त्यातूनच जनतेकडून खंडणी मागणे, त्यांना त्रास देणे असे कारभार सुरू झाले.
नांदेडच्या कंधार पोलीस ठाण्यात एका व्यापाऱ्याला अशाच प्रकारचे कॉल आल्यानंतर त्या संदर्भाचा गुन्हा दाखल करण्यात आला. नांदेड पोलीसांनी याची तांत्रिक तपासणी केली तेंव्हा एक कॉल आला तेंव्हा कॉल करणारा व्यक्ती कर्नाटकात होता, दुसरा कॉल आला तेंव्हा तो तामिळनाडूमध्ये होता, तिसरा कॉल आला तेंव्हा तो पश्चिम बंगालमध्ये होता. आता अशा पध्दतीने काही मिनिटाच्या आत सिमकार्डचे लोकेशन हजारो किलो मिटर बदलत असेल तर त्या व्यक्तीला शोधणे अवघडच आहे. परंतू नांदेड पोलीसांनी या प्रकरणाला चांगल्याच प्रकारे मनाला लावून घेतले आणि आपल्या अधिकाऱ्यांना छत्तीसगड, तामिळनाडू, कर्नाटक आदी राज्यात पाठवून माहिती मिळविण्याचा प्रयत्न मिळवला तेंव्हा कर्नाटकातील एका दुकानात सर्वात पहिली कडी सापडली. त्या दुकानात सिमकार्ड रिचार्ज करण्याचा व्यवसाय होता. सिमबॉक्समध्ये सर्व कार्ड प्रिपेड कार्ड आहेत. यातील एक आरोपी सियाबुद्दीन अब्दुल रहेमान हा तपासादरम्यान दुबईमध्ये होता. पोलीसांनी त्याच्याबद्दल लुकआऊट नोटीस जारी केली. त्यानंतर विमान प्राधिकरणाने पोलीसांची मदत केली आणि जेंव्हा तो पुन्हा कर्नाटकात पोहचला तेंव्हा त्याला लगेच अटक करण्यात आली.सियाबुद्दीन हा रा.दांडेली ता.दांडेली जि.कारवार (कर्नाटक) याच्यासोबत त्याच गावचा जयेश अशोक बेटकर यालाही पकडले. त्यासोबतच केरळ राज्यातील राशिद अब्दुल अजीज नोट्टानविडन रा.कटाडी मोतेडम पोस्ट इडक्करा ता.निलमबुर जि.मल्लपुरम (केरळा)या तिघांना पोलीसांनी पकडले. त्यांच्याकडून 10 सिमबॉक्स, 1244 सिमकार्ड, 5 राऊंडर, लॅपटॉप असे साहित्य हस्तगत केले. तपासादरम्यान पोलीसांना या आरोपींकडून एका बॅंक खात्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्या आलेले पैसे आणि काढलेले पैस याचा हिशोब असून त्याची तपासणी आम्ही करत आहोत. सोबतच 1 हजार सिमकार्ड यांना कसे मिळाले याचीही तपासणी आम्ही करणार आहोत. व्हिओआयपीला व्हिएसएममध्ये बदलून त्याचे रुपांतरण जीएसएममध्ये करून स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी याचा वापर करणारी टोळी नांदेड जिल्हा पोलीसांनी अप्पर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार आणि पोलीस उपअधिक्षक नांदेड शहर सुरज गुरव यांच्या अधिपत्याखाली स्थापन करण्यात आलेल्या पथकाने पर्दाफाश केली.

पत्रकारांना या तांत्रिक माहिती बद्दल समजून सांगतांना अप्पर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार सात चित्रांद्वारे ही सर्व कार्यपध्दती कशा पध्दतीने चालते याचे विश्लेषण करून सांगितले.एका बेकायदेशीर कॉलला कायदेशीर स्वरुप देवून त्याचा वापर या टोळीने केलेला आहे. अशा प्रकरणांमध्ये सन 2015 ते 2018 या दरम्यान मुंबई पोलीस, सैन्य दल, तामिळनाडू पोलीसांनी असे अनेक गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. पण नांदेड जिल्हा पोलीसांनी ही कामगिरी पहिल्यादांच करून महाराष्ट्रात मुंबई शिवाय जिल्हा पोलीस दलाचे नाव उंच केले आहे.
या पथकामध्ये अप्पर पोलीस अधिक्षक खंडेराय धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी कंधार मारोती थोरात, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, कंधारचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, लिंबगावचे सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रकांत पवार, कंधारचे सहाय्यक पोलीस निरिक्षक आदित्य लोणीकर, आर्थिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक राजेश अलीवार, वजिराबादचे सहाय्यक पोलीस निरिक्षक राम केंद्रे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरिक्षक दशरथ आडे, दत्तात्रय काळे, गजानन दळवी सोबतच पोलीस ठाणे सायबर येथील पोलीस अंमलदार प्रकाश टाकरस, नदीम डांगे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा, विशेष पथक, सायबर सेल, पोलीस ठाणे वजिराबाद, पोलीस ठाणे कंधार येथील पोलीस अंमलदारांनी संयुक्तरित्या केलेल्या कार्यवाहीसाठी विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.शशिकांत महावरकर आणि पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी कौतुक केले आहे.
नांदेड जिल्हा पोलीसांचे जनतेला आवाहन
या गुन्ह्याची माहिती देतांना नांदेडचे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे आणि अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी जनतेला आवाहन केले आहे की, जनतेतील कोणालाही अशा प्रकारे काही मिनिटात भरपूर कॉल करून कोणी खंडणी मागितली असेल, इतर पध्दतीने त्रास दिला असेल त्याबद्दलची माहिती पोलीसांना द्यावी. आजच्या अगोदर सुध्दा असे घडले असेल तरी सुध्दा त्याची माहिती पोलीसांना द्यावी जेणे करून या बेकायदेशीर कामकाजात गुंतलेल्या लोकांना गजाआड करता येईल. माहिती सांगण्याऱ्यांचे नाव गुप्तच ठेवण्यात येईल.