नांदेड (जिमाका) – नांदेड जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागातील उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालय स्तरावर औषधांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी 10 ऑक्टोबर 2023 रोजी सखोल आढावा घेतला. या आढाव्यातील मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत रुपये 5 कोटी 90 लक्ष रुपये व आदिवासी उपयोजना सन 2023- 24 अंतर्गत 91 लक्ष 66 हजार रुपये उपलब्ध करून देण्यात आले. यासाठी एकूण 6 कोटी 81 लक्ष रुपयांची अर्थ संकल्पीय तरतूद करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शासन निर्णय ५ ऑक्टोबर २०२३ नुसार व मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांच्या 7 ऑक्टोबर 2023 रोजीच्या निर्गमित आदेशान्वये औषधी, साहित्य, सामग्री खरेदीची कार्यवाही तातडीने करण्याचे सूचित केले होते. त्याअनुषंगाने जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय स्तरावरून (ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या दर करारानुसार २० टक्के मर्यादित अत्यंत आवश्यक असणारी औषधी खरेदीचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. उर्वरित अनुदानातून औषधी व साहित्य, सामग्रीची खरेदी तातडीने उपलब्ध करून घेण्यासाठी या स्तरावरून 11 ऑक्टोबर 2023 ते 17 ऑक्टोबर २०२३ या दरम्यान अल्प कालावधीची जाहीर ई-निविदा प्रकाशित करण्यात आलेली आहे. यानुसार शासकीय रुग्णालयात औषधी उपलब्ध करून घेण्याची कार्यवाही जलद करण्यात येत आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.