नांदेड(प्रतिनिधी)-5 एप्रिल 2022 रोजी नांदेड येथील बांधकाम व्यवसायीक संजय बियाणी यांची 2 जणांनी गोळ्या घालून हत्या केली होती. या प्रकरणातील प्रत्यक्ष गोळ्या झाडणाऱ्यांपैकी एक हा अल्पवयीन आहे. त्याला सुध्दा नांदेड पोलीसांनी एनआयए कोर्टाच्या परवानगीनंतर नांदेडला आणले आहे. त्याच्या दोन माणसउपचार चाचण्या झाल्या आहेत.माणसउपचार तज्ञांनी घटना घडतांना तो अल्पवयीन असला तरी त्याचा खटला सर्वसाधारण माणसाप्रमाणे अर्थात वयस्कर या सदरात चालविण्यास परवानगी दिली असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे. या आमच्या माहितीला कोठूनही प्रशासकीय दुजोरा मात्र मिळत नाही.
नांदेड येथील बांधकाम व्यवसायीक संजय बियाणी यांची हत्या झाली. प्रत्यक्षात गोळ्या मारण्याचा सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहे. त्या आधारावर या गुन्ह्याचा तपास सुरू झाला. त्यात नांदेड पोलीसांनी कट रचून ही हत्या झाली अशा पध्दतीने तपास करत जवळपास 13 आरोपींना अटक केले. पुढे या गुन्ह्यात मकोका कायदा जोडला गेला. मकोका कायद्यातून दोन जणांची सुटका पण झाली. पण मुख्य गोळ्या मारणारे आरोपी सापडले नाहीत. त्या गोळ्या मारणाऱ्या दोघांना राष्ट्रीय तपास पथकाने नेपाळ देशाच्या सिमेवर अटक केली. त्यातील एकाचे नाव दिपक रांगा असे आहे. त्याला काही दिवसांपुर्वी नांदेड पोलीसांनी एनआयए कोर्टाच्या परवानीनंतर नांदेडला आणले होते. तो काही दिवस पोलीस कोठडीत राहिला. सध्या तो संजय बियाणी हत्याकांडात न्यायालयीन कोठडीत आहे. त्यानंतर दुसरा आरोपी दिव्यांशू रामचेत (काल्पनीक नाव) यास नांदेड पोलीसांनी एनआयए कोर्टाच्या परवानगीनंतर नांदेडला आणले. नांदेडच्या गुन्ह्यात त्याच्याविरुध्दचा खटला कसा चालावा याबद्दल नांदेडच्या शासकीय रुग्णालयात माणसउपचार तज्ञांद्वारे त्याची एक तपासणी शुक्रवार दि.13 ऑक्टोबर रोजी झाली. दुसरी तपासणी सोमवार 16 ऑक्टोबर रोजी झाली. या तपासणीच्या निष्कर्षानुसार संजय बियाणी यांच्या खटल्याचा तपास वयस्कर व्यक्ती या सदरात चालविण्यास काही हरकत नाही. असा निर्णय नांदेडच्या माणसउपचार तज्ञांनी घेतला असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. प्रशासनिक स्तरावर पोलीस विभाग किंवा वैद्यकीय अधिकारी यापैकी कोणीही दुजोरा देत नाही. परंतू माणसउपचार तज्ञांनी आपला निर्णय बंद लिफाफ्यात पोलीसांना दिला असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे.
नांदेड जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनात नांदेड पोलीसांनी प्रत्यक्ष गोळ्या झाडणाऱ्या दोन आरोपींना पकडून आणून कायदेशीर प्रक्रिया पुर्ण केली आहे. या संदर्भाने नांदेड पोलीसांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. या सर्व कार्यवाहीमध्ये तत्कालीन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, सध्याचे विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.शशिकांत महावरकर यांच्यावतीने नांदेड जिल्हा पोलीस दलास करण्यात आलेले मार्गदर्शन अत्यंत महत्वपुर्ण आहे.
संजय बियाणींवर प्रत्यक्ष गोळ्या झाडणारा अल्पवयीन बालकाविरुध्द वयस्कर सदरात खटला चालणार