रानभाजी व मराठवाडा खाद्य महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद; रानभाज्यांनी वेधले सर्वांचे लक्ष

नांदेड (जिमाका) : -मराठावाडा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रानभाजी व मराठवाडा खाद्य महोत्सवाचे आयोजन 19 व 20 ऑक्टोबर रोजी जिल्‍हाधिकारी कार्यालय परीसरात करण्यात आले होते. या महोत्सवाचे उदघाटन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते संपन्न झाले. या महोत्सवात शेतकऱ्यांनी दुर्मीळ असलेल्या सर्व रानभाज्या व उत्पादने विक्री व प्रदर्शनासाठी ठेवले होते. या रानभाजी व मराठवाडा खाद्य महोत्सवास शेतकऱ्यांचा व शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या रानभाजी महोत्सवात श्रावणात उपलब्ध असणाऱ्या बहुतांश रानभाज्या येथे विक्रीसाठी उपलब्ध होत्या. यात प्रामुख्याने कर्टुली, शेवगा, घोळ, चवळी, बांबूचे कोंब, दिंडा, टाळका, पिंपळ, मायाळ, पाथरी, अळू, कपाळफोडी, कुरडू, उंबर, चिवळ, भुई आवळी इ. कंदभाज्‍या व सेंद्रीय हिरव्‍या भाज्‍या, फळभाज्‍या व फूलभाज्‍या व सीताफळ, ड्रँगन फ्रुट, रानफळांची व शेतकऱ्यांनी विविध उत्‍पादीत केलेली उत्पादने, सेंद्रीय उत्‍पादने, गुळ, हळद, लाकडी घाण्‍याचे तेल, गहू, सर्व प्रकारच्या डाळी व भुईमुगाच्‍या शेंगा, मुगाच्‍या शेंगा व केळीचे वेफर्स प्रदर्शन व विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आले होते. या महोत्सवात 70 स्टॉल धारकांनी सहभाग नोंदविला असून 15 लाख रुपयांची उलाढाल झाली आहे.

या महोत्सवात रानभाजी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या पाककलेत 9 स्पर्धकांनी सहभाग घेतला. यामध्ये मिक्स लाडू, डोरले टोमॅटो चटणी, कुंदरु भाजी भाकरी, खारे शंकरपाळे, पांढरी वसु मानचुरियन, गोड खाजा, छोटी घोळ भाजी भाकरी, प्रोटीन ढोकळा, उपवासाचा पराठा, शेंगदाणा लाडू, मोड आलेले धान्यपासून पराठे हे पदार्थ बनविण्यात आले होते. या पाककलेसाठी परिक्षक म्हणून प्रज्ञा दुधामल यांची उपस्थिती होती.

सहभागी स्पर्धकांमधून प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक निवड करण्यात आले. प्रथम क्रमांक पांढरी वसु मानचुरियन हा पदार्थ बनविणाऱ्या श्रीमती मिना व्यंकटी जाधव, ईजळी ता. मुदखेड यांना तर दुसरा क्रमांक श्रीमती वनिता दिगांबर कदम, ता. मुदखेड यांनी कुंदरु भाजी भाकरीसाठी देण्यात आला, तिसरा क्रमांक श्रीमती अर्चना प्रदिप कसबे, मुदखेड यांना डोरले टोमॅटोची चटणी पदार्थ बनवली याबाबत देण्यात आला. या विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक स्वरूपात प्रमाणपत्र व भेटवस्तू देवून गौरविण्यात आले. उर्वरित सहभागी स्पर्धकांना प्रोत्साहन पर प्रमाणपत्र देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *