
नांदेड(प्रतिनिधी)-आज पोलीस हुतात्मा दिनानिमित्त देशात 189 पोलीस अधिकारी यांनी आपल्या कर्तव्यादरम्यान मातृभुमीच्या संरक्षणासाठी प्राणांची आहुती दिली या संदर्भाने बोलतांना पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे म्हणाले आम्ही समाजात राहतो. समाजातील वाईट व्यक्तींना वठणीवर आणण्यासाठी काम करतो यात सुध्दा आपल्या अनेक अधिकारी आणि पोलीस अंमलदारांना इजा होते. तेंव्हा आम्ही आपले काम करतांना जास्त दक्षता बाळगायला हवी आणि समाजात शांतता राखण्यासाठी कायम प्रयत्न करण्याची गरज आहे.
21 ऑक्टोबर हा दिन देशात पोलीस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. याच्या ईतिहासाप्रमाणे 21 ऑक्टोबर 1989 रोजी चिन देशाच्या सिमेवर गस्त घालणारे 10 जवान अनपेक्षीत आलेल्या हल्याला तोंड देतांना धारातिर्थी पडले होते. त्या दिवसापासून 21 ऑक्टोबर हा हुतात्मा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.मातृभुमीचे रक्षण करणे, नागरीकांच्या जिवीताचे व मालमत्तेचे रक्षण करणे ही कर्तव्ये बजावत असतांना पोलीस दलातील अनेक अधिकारी व अंमलदार यांना प्रसंगी प्राणाची आहुती द्यावी लागते. म्हणूनच आम्ही 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून पाळत आहोत. आजच्या पोलीस हुतात्मा दिनानिमित्त सांगतांना गहीवरुन येत आहे की, मागच्या वर्षात 189 पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. म्हणूनच आजचा दिवस प्रशासनासाठी अत्यंत महत्वपूर्ण दिवस आहे. त्या सर्व हुतात्म्यांना श्रध्दांजली अर्पण करून मी आपल्या सर्वांच्यावतीने अभिवादन करतो. याप्रसंगी पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायग आणि मारोती थोरात यांनी मागील वर्षी धारातिर्थी पडलेल्या पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांची 189 नावे वाचवून दाखवली.
देशाचे सैनिक इतर शत्रुंपासून आपले रक्षण करतात.आम्ही पोलीस दलात आहोत आम्हाला समाजात असणाऱ्या समाजाच्या शत्रुंपासून समाजाची रक्षा करण्याची जबाबदारी मिळाली आहे. ही जबाबदारी पार पाडतांना सर्वात महत्वपूर्ण आणि सर्वांनी एकमताने आपले काम पुर्णत्वाकडे नेणे गरजेचे आहे.
याप्रसंगी विभागीय रेल्वे बोर्डाच्या महाप्रबंधक निती सरकार, सौ.स्नेह कोकाटे ह्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. सोबतच पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मानवी हक्क आयोगाचे पोलीस अधिक्षक योगेशकुमार, महानगरपालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव, सुशिलकुमार नायक, मारोती थोरात, पर्यवेक्षाधिन पोलीस उपअधिक्षक सुरज जगताप या सर्वांनी हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून आपल्या श्रध्दा अर्पण केल्या.










