पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांची विद्यापीठाकडून कोंडी : न्यायासाठी प्रा. राजू सोनसळे यांच्या नेतृत्वात उद्यापासून आंदोलन

नांदेड(प्रतिनिधी)-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विविध विभागातून पीएचडी करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांची कोंडी करण्याचे काम स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासनाकडून होत आहे. नियमांना डावलून मनमानी कारभार चालवत काही निवडक घटकालाच सहकार्य करण्याची भूमिका विद्यापीठाने घेतली असून यासह विविध मागण्यांसाठी उद्या दिनांक 27 ऑक्टोबर पासून विद्यापीठांसमोर धरणे आंदोलन निदर्शने आणि अमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती पीएचडी संशोधक विद्यार्थी कृती समितीच्या वतीने प्रा. राजू सोनसळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना प्रा. राजू सोनसळे पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात आणि देशात स्पर्धा परीक्षा दर वर्षी होतात. सेट नीट ची परीक्षा दरवर्षी घेतली जाते परंतु पीएचडीसाठी आवश्यक असणारी पेट परीक्षा मात्र स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ दरवर्षी घेत नाही. त्यामुळे ही परीक्षा दरवर्षी घेण्यात यावी. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ च्या वतीने घेण्यात आलेल्या पेट 2022 मधील रिक्त असलेल्या एससी, एसटी ,एनटी, ओबीसी, पीएच अँड इ डब्ल्यू एस प्रवर्गातील उमेदवारांच्या जागा भरण्याकरिता विशेष बैठकीच्या दिनांक 23 एप्रिल 2023 रोजीच्या परिपत्रकाची तात्काळ अंमलबजावणी करावी. कोविड काळात लॉकडाऊनमुळे ज्या संशोधकांना पीएचडी चे काम पूर्ण करता आले नाही अशा संशोधक विद्यार्थ्यांना विशेष बाब म्हणून आपले संशोधन पूर्ण करण्याची पुन्हा संधी देऊन मुदतवाढ द्यावी. फेलोशिप प्राप्त संशोधक विद्यार्थ्यांना दररोज संशोधन केंद्रावर बायोमेट्रिक नुसार ठसा लावण्याची करण्यात आलेली सक्ती तातडीने मागे घ्यावी अशा मागण्याही या निमित्ताने त्यांनी विद्यापीठ प्रशासनासमोर ठेवल्या आहेत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात सध्या मनमानी कारभार सुरू आहे. यूजीसीच्या नियमांना डावलून कुलगुरू आणि संबंधित विभाग संशोधक विद्यार्थ्यांची कोंडी करत आहे. त्यामुळे संबंधितांची तात्काळ चौकशी करावी आणि विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही प्रा. सोनसळे यांनी दिला आहे. याच मागण्यासाठी दिनांक 27 ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजल्यापासून आमरण उपोषण करण्यात येणार आहे . धरणे आंदोलन करण्यात येणार आहेत . निदर्शने करण्यात येणार आहेत . त्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीला स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठाच्या संबंधित विभागाचे अधिकारी जबाबदार असतील असा इशाराही त्यांनी दिला. या पत्रकार परिषदेला संशोधक विद्यार्थी रवी वाघमारे ऍड यशोनील मोगले, गोपाळ वाघमारे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *