डॉ.ऋतुराज जाधव यांच्या अंगरक्षकाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

नांदेड,(प्रतिनिधी)- जिल्ह्यातील पोलिस अंमलदाराने कलंबर – उस्माननगर रस्त्यावर एका मारुती मंदिराजवळ स्वतःच गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली आहे. त्याच्याकडे एक चिठ्ठी सापडली आहे असे सांगतात.

काल दिनांक 25 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता नांदेड जिल्ह्यातील पोलीस अंमलदार गोविंद गंगाधर मुंडे (31) हे दुचाकीवरून कलंबर ते उस्माननगर रस्त्यावर प्रवास करत असताना त्या ठिकाणी असलेल्या एका मारुती मंदिराजवळ थांबले. आपल्या पत्नीला फोन करून माझा अपघात झाला आहे असे सांगितले आणि त्यानंतर त्यांनी आपल्या हनुवटीवर स्वतः जवळचे सर्विस रिवाल्वर ठेवून गोळी झाडली. ती गोळी कवटी फोडून बाहेर निघाली आणि मंदिराच्या टीनशेड मधून सुद्धा बाहेर गेली. हा घटनाक्रम सायंकाळी 6 ते 7 वाजे दरम्यान घडला.

मरण पावलेले पोलीस अंमलदार गोविंद गंगाधर मुंडे यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवलेली आहे. त्यांचे सर्विस रिवाल्वर त्यांच्या मृतदेहाच्या शेजारीच पडलेले होते. ते मूळ राहणारे पिंपळाची वाडी तालुका कंधार येथील आहेत आणि त्यांचे आजोळ वर्ताळा ता. मुखेड येथे आहे.

चिठ्ठी मध्ये लिहिलेली कारणे काय आहेत याबाबत अद्याप माहिती प्राप्त झाली नाही. उस्माननगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रसाद मुळे यांनी सांगितले की लवकरात लवकर याप्रकरणी कायदेशीर कार्यवाही करू आणि चिठ्ठी मध्ये दोषी असलेल्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करू. पोलीस अंमलदार गोविंद मुंडे हे प्रसिद्ध न्यूरो सर्जन डॉ. ऋतुराज जाधव यांच्याकडे सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होते. काल दिनांक 25 ऑक्टोबर रोजी त्यांची सुट्टी होती.घडलेल्या या दुर्दैवी प्रकाराने पोलीस खात्यात हळहळ व्यक्त होत आहे गोविंद मुंडे यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी असा परिवार आहे वास्तव न्यूज लाईव्ह परिवार सुद्धा गोविंद मुंडे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *