12 लाख 65 हजार 4 रुपये भरून 78 दुकानदारांना मिळाली आहे परवानगी
नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील आयुर्वेदिक महाविद्यालयासमोर असलेल्या भिंतीला लागून स्वेटर विक्री करण्याचा व्यवसाय हा जवळपास 50 वर्षापुर्वीपेक्षा जास्त काळापासून सुरू आहे. सन 2017 मध्ये मनपाने त्यात अडचणी आणल्या. मग तेंव्हा स्वेटर विक्रेत्यांनी उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे उंबरठे झिजवले. त्यानंतर काही नियम व अटीनुसार त्यांना परवानगी मिळू लागली. यंदा सुध्दा 78 स्वेटर विक्रेत्या दुकानदारांनी 12 लाख 65 हजार 4 रुपये महानगरपालिकेत 17 ऑक्टोबर 2023 रोजी भरले आहेत. पण आता वाहतुक पोलीस त्यांना त्रास देत आहे. मुळात त्यांनी दुकाने कशी लावावीत ते चुकले असतील तर त्यांच्यावर कार्यवाही करण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे. पण वाहतुक पोलीसांना त्यात जास्त रस वाटतो. त्यातही गाडी चालक असलेला रवि राठोड हा पोलीस अंमलदार वारंवार अध्यक्ष अब्दुल सलाम अब्दुल वाहब यांना येवून भेट आहे. पोलीसांसोबत “भेटणे’ याचा अर्थ सर्वांनाच माहित आहे. शहरातील किसान मॉल, गोदावरी बेकरी अशा अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे वाहतुकीस अडथळा होईल अशा पध्दतीने वाहने उभी असतात. त्यावर कार्यवाही करण्यात वाहतुक पोलीसांना रस नाही.
अनेक अडचणींना तोंड देत नांदेडमध्ये स्वेटर विक्रेत्यांनी एक युनियन बनवली. त्याचे अध्यक्ष अब्दुल सलाम अब्दुल वाहब हे आहेत. ते ज्या संघटनेचे अध्यक्ष आहेत ती संघटना व त्यातील सदस्य मफलर व स्वेटर विक्री करण्याचा किरकोळ व्यवसाय करतात. यंदा 17 ऑक्टोबर रोजी त्यांनी 12 लाख 65 हजार 4 रुपये मनपाकडे भरून मनपा जावक क्रमांक 9280/2023 नुसार परवानगी मिळवली. या परवानगी मालमत्ता व्यवस्थापक महानगरपालिका यांची स्वाक्षरी आहे. सोबत या परवानगीच्या प्रती अनेकांना देण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये पोलीस निरिक्षक शहर वाहतुक शाखा यांनाही एक प्रत पाठविण्यात आली आहे. आमच्याकडे तक्रार आल्याशिवाय आम्ही तरी काय करणार असे पोलीस सांगतात. पण ही परवानगी आल्यानंतर लगेच काही दिवसांपासून वाहतुक शाखेतील चालक पोलीस अंमलदार रवि राठोड वारंवार या दुकानदारांकडे जात आहे आणि त्यांना तुमचे चुकले आहे, तुमची दुकाने मागे घ्या असे सांगत आहेत. अब्दुल सलाम अब्दुल वाहब वास्तव न्युज लाईव्हला सांगत होते की, कोणी तरी साहेब पण आहेत जे आम्हाला बोलतात आणि आमची दुकाने मागे घ्या म्हणतात. आजपर्यंत आम्ही अशाच प्रकारे दुकाने लावत आहोत परंतू कोणीच यावर आक्षेप घेतलेला नाही.
या दुकानांच्या समोर जाऊन उभे राहिले असता त्याचे एक छायाचित्र सुध्दा आम्ही घेतले. ज्यामध्ये रस्त्याच्या बांधणी प्रमाणे तयार करण्यात आलेला सायकलचा रस्ता पुर्णपणे मोकळा आहे . याच जागेवर स्वेटर विक्रेता दुकानदारांचे ग्राहक थांबतात आणि तेथे व्यवसाय होतो. पण वाहतुक पोलीसांना या 78 दुकानदारांमध्ये त्यांची दुकाने मागे करण्यात काय रस आहे. हे समजत नाही.
नांदेड शहराच्या शिवाजीनगर उड्डाणपुलावर डॉक्टर्स लेनकडे जाणाऱ्या रस्त्यावर एकीकडून बेकायदेशीर वाहनतळ तयार झाले आहे. त्या बेकायदेशीर वाहनतळावर वाहतुक पोलीसांचे लक्ष नाही. किंबहुना त्यांना काही देणे घेणे नाही. तसेच आयटीआय जवळ असलेले किसान मॉल, गोदावरी बेकरी, श्रीनगरमधील अनेक दुकाने यांच्यासमोर बेकायदेशीर वाहन पार्क करून वाहन धारक निघून जातात त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा होतो. याही बाबीकडे नांदेड वाहतुक शाखा क्रमांक 1 चे लक्ष नाही. परंतू तीन महिन्यासाठी रस्त्यावर बसून आपला व्यवसाय चालविण्यासाठी 12 लाख 65 हजार 4 रुपये फिस भरून परवागनी मिळवलेल्या स्वेटर विक्रेत्यांच्या दुकानाच्या साईजवर मात्र वाहतुक पोलीसांना भरपूर रस आहे.
