खा.चिखलीकरांच्या गाडीसह तीन गाड्या फोडल्या
नांदेड(प्रतिनिधी)-मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला ठरल्याप्रमाणे पाठींबा देत नांदेडमधील मराठा समाजाने भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वैयक्तीक गाडीसह त्यांच्या ताफ्यातील दोन इतर गाड्या फोडून नेत्यांना असलेल्या गावबंदीचा उद्घाटनाचा कार्यक्रम केला.
कंधार तालुक्यातील अंबुलगा येथे माजी जि.प.सदस्य मनोहर तेलंग यांच्या घरी गेले होते. गावातील मराठा समाजाने त्यांना बाहेर येण्यास सांगितले पण ते आले नाहीत. प्रताप पाटील चिखलीकर मनोहर तेलंग यांच्या घरात असतांनाच त्यांच्या स्वत:च्या वापराची काळ्या रंगाची गाडी जिचा क्रमांक 707 आहे तसेच इतर दोन अशा तीन गाड्या फोडून टाकल्या. या अगोदर पोलीसांनी मध्यस्थी करून काही समस्या तयार होणार नाही याची दक्षता घेतली होती. परंतू गावबंदी केल्यानंतर सुध्दा खा.प्रताप पाटील चिखलीकर हे आमच्या गावात का आले या रोषातून हा गाडी फोडण्याचा प्रकार करून पहिला उद्घाटनाचा प्रकार घडविला.
8 महिन्यापुर्वीचे हरविंदरसिंघ उर्फ रिंदा या अतिरेक्याचे पत्र दाखवून खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी दोन वर्षापुर्वी आपल्या सुरक्षेत वाढ करून घेतली होती. त्यांना एसपीजी पथक सध्या सुरक्षा देत आहे. तरी पण हा प्रकार घडला. पोलीसांनी कसे-बसे पोलीसांच्या गाडीत बसवून प्रताप पाटील चिखलीकर यांची अंबुलगा येथून रवानगी केली. याप्रकरणात पुढे काय घडले याबद्दल अद्याप माहिती प्राप्त झाली नाही. नांदेड जिल्हा आंदोलनांसाठी नेहमीच प्रसिध्द आहे. नेत्यांना गावबंदी केल्यानंतर हा पहिला प्रकार नांदेडमध्येच घडला आहे.
मन्याडच्या वाघाला सकल मराठा समाजाने दिला झटका