नांदेड(प्रतिनिधी)-ऍटो घरासमोर का लावला यावरून झालेल्या भांडणातील दोन जणांना हदगाव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी रामचंद्र माने यांनी प्रत्येकी 10 हजार रुपये रोख दंड जो मारहाण झालेल्या पिडीत व्यक्तीला द्यायचा आहे. तसेच दोषींना परिवेक्षाधिन गुन्हेगारी कायद्याअंतर्गत 1 वर्ष चांगल्या वर्तणुकीच्या बॉन्डवर मुक्त करण्यात आले आहे.
काशीनाथ नागोराव कांबळे रा.निमगाव ता.हदगाव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 2 जून 2015 रोजी सायंकाळी 5 वाजता निमगाव येथे आपल्या घरी जेवन करत असतांना त्यांचे शेजारी दिगंबर नागोजी कांबळे (45) आणि बिबिषण दिगंबर कांबळे दोघे रा.पार्डी मक्ता ता.अर्धापूर हे नागोराव कांबळेच्या घरी आले आणि त्यांनी सांगितले की, तुझा ऍटो क्रमांक एम.एच.26 एच.4251 हा त्यांच्या घरासमोर का लावला म्हणून भांडण उकरले. काशीनाथला मारहाण करून दिगंबर आणि बिबिषणे लोखंडी गजाने डोकेफोडून त्यांना जखमी केले. या प्रकरणी पोलीस अंमलदार आर.एन.कराड यांनी दिगंबर आणि बिबिषण विरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने ऍड.गिरीश मोरे यांनी पाच साक्षीदार तपासले. मनाठ्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष शेकडे यांच्या मार्गदर्शनात पैरवी अधिकारी पोलीस अंमलदार उदाजी खुपसे यांनी काम पाहिले.
न्यायालयाने प्रक्रिया संहितेच्या कलम 357(3) प्रमाणे दिगंबर आणि बिबिषणलाा प्रत्येकी 10 हजार रुपये रोख दंड ठोठावला. दंडाची रक्कम जखमी तथा फिर्यादी काशीनाथ नागोराव कांबळेयांना द्यायची आहे. तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम 324 आणि 323 नुसार बिबिषण आणि दिगंबरलाा दोषी जाहीर करण्यात आले असून त्यांना चांगल्या वर्तणुकीच्या एका वर्षाच्या बॉन्डवर सध्या तरी मुक्तता मिळाली आहे. बॉन्डचे उल्लंघन केल्यास त्यांना पुन्हा शिक्षा होवू शकते.
मारामारी करणाऱ्या 2 जणांना 20 हजारांचा दंड