“यशवंत’ असलेल्या पोलीस निरिक्षक चिखलीकरांना हळव्या मनाने सेवानिवृत्तीचा निरोप
नांदेड जिल्ह्यात जवळपास 6 वर्ष, त्यातील 46 महिने फक्त स्थानिक गुन्हे शाखा असा नांदेड जिल्ह्याचा कार्यकाळ पुर्ण करतांना राष्ट्रपती पदक प्राप्त करणाऱ्या पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांना निरोप देतांना असे म्हणायचे आहे की, पुढे आपण पांढरा पोशाख परिधान करणार आहात. तेंव्हा सांभाळून सांभाळून चाला. कारण हे खोट्या आरोपांचे जग आहे. त्यामुळे डाग लवकर लागतात. पण आता तरी ज्या “सुणियांना’सांभाळणे पोलीस विभागात असल्यामुळे आपली गरज होती. आता तरी त्या “सुणियांना’ सेवानिवृत्तीनंतर हद्दपार करा. जेणे करून आपल्या पुढील आयुष्यात ती घाण आपल्यासोबत राहणार नाही. प्रत्येक नात्यामध्ये लाभ शोधता येत नसतो. काही नाते फक्त मानसिक आनंद देतात. आता त्यावर जास्त भर देत आपले पोलीस सेवानिवृत्ती नंतरचे जीवन “यशवंत’ व्हावे. याच शुभकामना.
आपला नांदेड जिल्ह्यात प्रवेश झाला तेंव्हा आपल्या प्रवेशाअगोदरच आपल्यासाठी देगलूर पोलीस ठाणे रिकामे ठेवण्यात आले होते. आपली ही किंमत अनमोल होती. त्यानंतर आपल्याला नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. अनेक प्रसंग असे आहेत की, जे आम्ही लिहुन आज ईतिहास पुन्हा एकदा उजळू इच्छीत नाही. कारण घटना घडल्या तेंव्हा ते सर्व आम्ही लिहिलेले आहे. एका राजकीय अडचणीमुळे आपल्याला नांदेड ग्रामीण हे पोलीस ठाणे सोडावे लागले.त्यानंतर, माझा पोलीस अधिकारी राजकारण्यांपेक्षा मोठा राजकारणी असावा तरच तो माझा अधिकारी असे सेवानिवृत्त अपर पोलीस महासंचालक श्री.व्ही.व्ही.लक्ष्मीनारायणजी सांगत होते. या परिस्थितीत सुध्दा आपण श्री. लक्ष्मीनारायण साहेबांचे शब्द खरे करून दाखवले. परंतू आपण केलेले देगलूर पोलीस ठाणे आपल्याला दुसऱ्यांदा देण्यात आले. एकच पोलीस ठाणे दुसऱ्यांदा करत असतांना येणाऱ्या अडचणींना ओळखून आपण तेथे यशस्वीपणे काम केले. त्यादरम्यान स्थानिक गुन्हा शाखेच्या खुर्चीसाठी चाललेली धावपळ, सुरू असलेले खलबत यांच्यावर मात करून आपण स्थानिक गुन्हा शाखेची खुर्ची मिळवली. स्थानिक गुन्हा शाखेची खुर्ची म्हणजे पोलीस अधिक्षकांचा उजवा हात असतो. स्थानिक गुन्हा शाखेच्या काळात आजचे पोलीस अधिक्षक चौथे पोलीस अधिक्षक आहेत. आपण या सर्वांसोबत काम करतांना मी खुर्चीचा सेवक आहे. हे सिध्द करून दाखवले आणि त्यामुळेच कोणत्याही पोलीस अधिक्षकांकडून आपल्याला काही अडचण आली नाही. एका राजकीय व्यक्तींने मात्र उगीचच याचा बाऊ केला होता. परंतू त्यांचे दुर्देव आणि आपले सुदैव त्यांना यश आले नाही आणि या कालखंडात आपण 46 महिने अर्थात 3 वर्ष 10 महिने असा रेकॉर्ड कालखंड स्थानिक गुन्हा शाखेच्या खुर्चीवर पुर्ण केला आहे. याबद्दल आपले कौतुक करावे तेवढे कमी आहे. ही खुर्ची सांभाळत असतांना “सुर्याजी पिसाळने’ सुध्दा भरपूर प्रयत्न केले. पण त्या प्रयत्नांना आपण यश येवू दिले नाही. ती आपली कलाकारी इतर पोलीस अधिकाऱ्यांनी शिकण्यासारखी आहे. प्रशासन चालवतांना काही वेळेस मात्र इतरांचे ऐकून आपण काही जणांवर अन्याय पण केलेला आहे असो हा प्रशासनाचा भाग आहे. याच कालखंडात आपला राष्ट्रपती पदकासाठीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आणि तो मंजुर झाला आहे. राष्ट्रपती पदक सेवानिवृत्तीनंतर मिळणार आहे पण ते पदक प्राप्त करणे हे अत्यंत अलौकिक आहे. त्यामुळे त्या पदकाच्या अनुरूप आपल्याला पुढे वागावे लागेल आणि त्याची सार्थता दाखवावी लागेल. ही जबादारी सुध्दा त्या पदकामुळे आपल्याकडे आली आहे. आपण त्याला न्याय द्याल हीच अपेक्षा.
नांदेड जिल्ह्यात झालेले खून, दरोडे,चोऱ्या आणि त्यातील पकडलेले गुन्हेगार यांची संख्या लिहिली तर ती खुप लांब होईल. परंतू आपण या कालखंडात गुन्हेगारांवर तयार केलेला वचक कायम राहिला परंतू गुन्हे घडतच राहिले हा काही तुमचा दोष नाही हा निसर्ग नियम आहे. पण घडलेल्या गुन्ह्यांना उघडकीस आणून आपण आरोपींना पकडण्यासाठी देशातील अनेक राज्यांमध्ये प्रवास केला आणि तेथून सुध्दा आरोपी पकडून आणले.करोडो रुपयांची दरोडा आणि चोरीमध्ये गायब झालेली संपत्ती आपण परत मिळवली. अनेक बंदुका जप्त केल्या आणि बंदुकीच्या धाकावर दहशत माजविणाऱ्यांवर जरब आणली. आपले नाव घ्यायला नांदेड जिल्ह्यातील गुन्हेगार मंडळी भितात. ज्यामुळे नांदेड जिल्हा पोलीस दलाचे नाव उंचीवर आले. आपण आरोपी पकडण्यासाठी गेले असतांना काही “मिर सादीक’ आणि “मिर जाफर’ या वृत्तीच्या लोकांनी आपली मोहिम यशस्वी होवू नये यासाठी सुध्दा भरपूर प्रयत्न केले. परंतू म्हणतात ना आपल्या मेहनतीसोबत आपले नशीब आपल्या सोबत होते आणि यश आपल्याकडेच आले.
सेवानिवृत्तीनंतरच्या जीवनात आज आपण जे काही आहोत ते पोलीस दलाच्या मेहरबानीमुळेच आहोत हे कधीच विसरू नका. कारण संरक्षण विभागातील सर्व खात्यांना पायाचे नख झाकण्यापासून ते डोके झाकण्यासाठी संपूर्ण पेहराव मोफत मिळत असतो. आता त्यात काही बदल झाले आहेत. या पुढील जीवनात लक्ष सर्वोपरी ठेवा. त्यामुळे आलोचना, विवेचना आणि प्रसन्नता काही महत्व ठेवणार नाही. यानंतर कोणी तुमच्या बद्दल वाईट बोलले तर हिंदी कवी शब्दात त्याला विचार, “ठिक से जानते हो मुझे या युही मन हलका कर रहे हो।’
आजच्या धावत्या युगात प्रेम हे शिल्लक राहिलेले नाही तेेंव्हा कोणावरही प्रेम करतांना त्याची संपूर्ण पारख करणे अत्यंत आवश्यक आहे. हिंदी विचारवंत म्हणतो की,
“कैसे विश्र्वास करे इन्सान की मोहब्बत पर,
मय्यत मै रोनेवाले भी तेरहवी में गरम पुडी मांगते है ।’
मग अशा परिस्थितीत जगतांना थोडीसी अवघड परिस्थिती आम्ही लिहिली असे वाटेल. परंतू आम्ही सत्यच लिहिले आहे. त्या शिवाय आम्ही जगलोच नाहीत. पुढच्या जीवनात स्वत:पेक्षा इतरांना मोठे समजा तो तुमच्या मनाचा मोठेपणा असेल. जर तुम्हाला जग जिंकायचे असेल तर आपल्याला मुंगी होवून साखर खायला शिकले पाहिजे. हेच तत्व आपल्या मनाचे आणि विचार सरणीचे असायला हवे. या संदर्भाने सुध्दा एक हिंदी कवी सांगतो, “बेहतर जिवन के लिए आलोचना में छिपे सत्य और प्रशंसा के पिछे छिपे झुठ को समजना जरुरी होता है।’ एक दु:खही व्यक्त करावे वाटते. आपल्या हातात जिल्ह्याची सत्ता असतांना काही लोकांसोबत असेही घडले आहे की, त्याबद्दल कवी म्हणतो,
“समय जब खराब आता है तो वो भी हमला करते है,
जिन की, औकात हमारे सामने दो कौडी की हो…’. तरीपण या शब्दांसह आम्ही माऊलींचे शब्द सुध्दा उल्लेखीत करू इच्छीतो ज्यात माऊली म्हणतात, “ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान’… आपण 46 महिने पुर्ण केलेला एलसीबीचा कालखंड पुन्हा एकदा घडेल असे आज तरी दिसत नाही. परंतू असे म्हणतात ईतिहास पुन्हा-पुन्हा येत असतो आणि स्वत:च मी काही वर्षानंतर आलो आहे असे दाखवत असतो. पण ही भावना ठेवणाऱ्यांना तो परत आलेला ईतिहास दिसेल का नाही माहित नाही पण त्यांची भावना हिंदी कवी शब्दात अशी आहे की,
“इतना संगीन पाप करे, मेरे दु:खपर विलाप कोन करें,
चेतना मर चुकी है लोगों की पाप पर पश्चाताप कोन करें।’
मागील 46 महिन्यांमध्ये आमच्या लिहिण्यातून आपल्याला कधी दु:खावले गेले असेल तर त्यासाठी आम्ही खेद व्यक्त करत आहोत. आमचे लिखाण त्या घटनेच्या अनुरूप आणि त्यातील सत्य आपल्यासमोर मांडण्यासाठी होते. बरेच सत्य आम्ही आपल्याला न लिहिता ही सांगितलेले आहेत. त्यात कधी काळी आमच्यावर विश्र्वास दाखविण्यात आला नाही तरी आम्ही गप्प राहिलो पण पुढे आमचे सांगणेच सत्य होते ही बाब आपल्या समोर सुध्दा आली आहे.ज्या लोकांचा आवाज उंचीवर जात नाही त्या लोकांसाठीच काम करतांना आम्ही आपल्याबद्दल लिहिलेल्या शब्दांसाठी आज आपल्या सेवानिवृत्तीच्या दिवशी जाहीर माफी मागत आहोत. ज्याप्रमाणे आपण सुध्दा आपल्या सहकाऱ्यांना असेच शब्द वापरता तसेच आमच्या शब्दांना सुध्दा मान द्या आणि भविष्यातील गोलाकार जीवनात पुन्हा कधी भेट झाली तर एक दुसऱ्या प्रति प्रेमाची भावना कायम राहावी अशी अपेक्षा..
भविष्यातील जीवनात वाटा सापडत जातील, आपण शोधत जायचे.. माणस बदलत जातील, आपण स्विकारत जायच.. परिस्थिती शिकवत जाईल आपण शिकत जायच..येणारे दिवस निघून जातील, आपण ते क्षण जपत जायच.. विश्र्वास तोडून अनेक जण जातील आपण सावरत जायच.. प्रसंग परिक्षा घेत जाईल, आपण क्षमता दाखवत जायच.. जीवन हे असच जगायच असत या शब्दांसह “आमरा आपण के भुलाबा ना आणि आम्ही तोमा को भालो बासी’. या शब्दांसह भावी जीवनासाठी पुन्हा एकदा शुभकामना…
