
नांदेड,(प्रतिनिधी)-मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणास सुरूवात केलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आज नांदेड जिल्ह्यातील अनेक गावकऱ्यांनी ट्रॅक्टरमध्ये येवून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या साखळी उपोषणाला पाठींबा दर्शवला. जिल्ह्यात अनेक ठिकाणी रास्ता रोखो आंदोलन करण्यात आले तसेच साखळी उपोषण सुरूच आहेत. काही दुकानांवर दगडफेक झाली त्यामुळे शहरातील इतर दुकाने आपोपाच बंद झाली.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण मिळावे यासाठी सुरू केलेल्या आमरण उपोषणास पाठींबा दर्शविण्यासाठी जिल्ह्यात अनेक ठिकाणी साखळी उपोषण सुरू आहेत. नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुध्दा साखळी उपोषण सुरू आहे. या साखळी उपोषणाला पाठींबा दर्शविण्यासाठी नियोजनबध्द पध्दतीने वेगवेगळ्या गावातील लोक दररोज येतात आणि साखळी उपोषणाला पाठींबा दर्शवतात.
आज पहाटे पासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. शहरात साखळी उपोषणाला पाठींबा दर्शविण्यासाठी आलेल्या लोकांनी काही दुकानांवर दगडफेक केली. त् यामुळे शहरातील इतर दुकाने आपोआपच बंद झाली. काही ठिकाणी रस्त्यावर टायर जाळण्यात आले. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार आंदोलनाला गालबोट लागू नये म्हणून मेहनत घेत आहेत.