नांदेड(प्रतिनिधी)-काल दि.30 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता पक्कीचाळ परिसरात 35 वर्षीय व्यक्तीचा खून करणाऱ्या दोन आरोपींना वजिराबाद गुन्हे शोध पथकाने काही तासातच जेरबंद केले. आज मुख्य न्यायदंडाधिकारी किर्ती जैन देसरडा यांनी दोन्ही मारेकऱ्यांना चार दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
काल सकाळी 8 वाजेच्यासुमारास पक्कीचाळ परिसरातील फुटबॉल मैदानाजवळ शिंदी विकण्याच्या कारणावरून राजू मलय्या मंदा आणि रितेश मानेमध्ये वाद झाला. या वादानंतर रितेश दिलीप माने (25) रा.दिलीपसिंघ कॉलनी आणि लखन पंजाब माने (28) रा.भावेशनगर नांदेड या दोघांनी राजू मलय्या मंदा (35) यास खाली पाडून त्याच्या डोक्यावर दगडाने ठेचले. ज्या दगडाने खून झाला. त्या दगडाचे वजन 18 किलो आहे अशी माहिती प्राप्त झाली आहे.
वजिराबाद गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवराज जमदडे, पोलीस अंमलदार शरदचंद्र चावरे, रमेश सुर्यवंशी, शेख इमरान, भाऊसाहेब राठोड, अरुण साखरे यांनी अत्यंत त्वरीत प्रभावाने मेहनत घेवून खून करणारे रितेश दिलीप माने आणि लखन पंजाब माने या दोघांना चार तासातच ताब्यात घेतले.
आज पोलीस अंमलदार संतोष पोकले आणि हनुमंत बोईनवाड यांनी पकडलेल्या मारेकऱ्यांना न्यायालयासमक्ष हजर करून तपासासाठी पोलीस कोठडी देण्याची विनंती केली तेंव्हा न्यायाधीश जैन यांनी 4 नोव्हेंबर 2023 पर्यंत अर्थात चार दिवस दोघांना पोलीस कोठडीत पाठविले आहे.
वजिराबाद गुन्हे शोध पथकाने चार तासात खूनी पकडले; दोघांना चार दिवस पोलीस कोठडी