शांतताप्रिय लढ्यासाठी प्रशासनाही मदतीला मात्र कायदा हातात घेतल्यास कारवाई- जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत

नांदेड (जिमाका) – समाज विघातक जाळपोळ, कायद्याचे पालन न करणे, झुंडगिरी करणे यात सर्वांनाच भरडावे लागते. ज्या काही आजवर दंगली झालेल्या आहेत त्याचे दुष्परिणाम सर्वसामान्यांसहित सर्व समाजांनी भोगलेले आहेत. रोजचे शांततामय जीवन आणि जीवन व्यवहार जर सुरळीत चालवायचे असतील तर रस्त्यावरील समाज विघातक कृत्याचा निषेध केला पाहिजे. सकल मराठा समाजाने आजवर ज्या शांततेने आंदोलन केले त्याला जर कोणी गालबोट लावत असेल तर सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी अशा लोकांना बाजुला करून त्यांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. शांतता व कायदा व सुव्यवस्थेला जर कोणी आव्हान देत असेल तर अशा समाजकंटकाविरूद्ध कायदेशीर बडगा आम्ही उगारून कठोर कारवाई करू, असा इशारा विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर यांनी दिला.

सकल मराठा समाजाच्या विविध पदाधिकाऱ्यांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, छावा प्रदेशाध्यक्ष पंजाबराव पाटील काळे, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर, छावा क्रांतीवीर सेनाचे प्रदेशाध्यक्ष राजेश मोरे, छावा जिल्हाध्यक्ष दशरथ पाटील कपाटे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील कोल्हे, विभागीय अध्यक्ष संकेत पाटील, सकल मराठा समाजाचे सुनिल पाटील कदम, अविनाश कदम, स्वप्नील सुर्यवंशी, संतोष माळकवठेकर, सदा पुयड, तिरूपती भगनूरे व विविध प्रतिनिधी उपस्थित होते.

 

समाजकंटकाविरूद्ध कठोर कारवाईचा इशारा– जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत

सर्वसामान्यांच्या जीविताचे रक्षण, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण हे मूल्य आपण स्वराज्याच्या लढ्यातून घेतले आहे. या मूल्यांवरच महाराष्ट्राने आजवर वाटचाल केली आहे. मराठा आरक्षण आंदोलनाच्यानिमित्ताने काही ठिकाणी आजवर आपण जपलेल्या स्वराज्याच्या लढ्यातील मूल्यांवरच घाला घातल्याचे आपण पाहत आहोत. काही ठिकाणी हिंसक घटना झाल्या. या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातून शांततेचा संदेश जावा यादृष्टीने सकल मराठा समाजाच्या सर्व पदाधिकाऱ्यांसमवेत जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनासमवेत झालेल्या बैठकीत सकल मराठा समाजाच्या सर्व सन्माननिय सदस्यांनी समंजस भूमिका घेऊन कोणत्याही स्थितीत जाळपोळ व हिंसा करणाऱ्यांची बाजू सकल मराठा समाज घेणार नाही हे जाहीर केले आहे. त्यांच्या या भावनेचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी म्हणून स्वागत करतो. शांतताप्रिय लढ्यासाठी प्रशासनाही मदतीला आहे, हे आश्वस्त केले. मात्र या शांतताप्रिय आंदोलनात समाजकंटक सामान्य जनतेला त्रास देत असतील, जाळपोळ, तोडफोड करत असतील, कायद्याचे उल्लंघन करत असतील तर अशा समाजकंटकाविरूद्ध कायद्याप्रमाणे आम्ही कठोर कारवाई करण्यासाठी तत्पर राहू असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्पष्ट केले. याचबरोबर जिल्ह्यातील कोणताही मार्ग, रस्ता बंद होणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचना पोलीस विभागाला दिल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *