सेवानिवृत्त पोलीसांनी आपल्या अनुभवाचा फायदा सध्या कार्यरत पोलीसांना द्यावा-डॉ.अश्र्विनी जगताप

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस विभागातून सेवानिवृत्त झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या जीवनातील अनुभवांचा फायदा नवीन अधिकाऱ्यांना द्यावा ज्यामुळे आम्हाला निर्णय घेणे सोपे होईल असे प्रतिपादन पोलीस उपअधिक्षक डॉ.अश्र्विनी जगताप यांनी केले.
आज पोलीस दलातून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, नियंत्रण कक्षातील नजिर हमजा हुसेन शेख, तामसा पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार पंडीत केशवराव कल्याणकर आणि किनवट पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार केशव माणिकराव मार्लेवाड या चौघांचा सेवानिवृत्तीनंतरच्या निरोप समारंभात डॉ.अश्र्विनी जगताप बोलत होत्या. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांच्या मार्गदर्शनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी पुढे बोलतांना डॉ.जगताप म्हणाल्या की, तुम्ही कोणी 32, 36 वर्ष पोलीस दलात सेवा दिलेली आहे. तुमच्या जीवनातील अनुभवांचा फायदा सध्या कार्यरत असलेल्या कनिष्ठ अधिकाऱ्यांना द्या म्हणजे पोलीस विभागातील काम करतांना त्यांना अडचणी येणार नाहीत. आम्हाला मिळालेला गणवेश हा समाजासाठी काही करता यावे म्हणून मिळाला आहे आणि त्याचा उपयोग घेत आम्ही सर्व काम करतो आहोत.

याप्रसंगी पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे आणि परीविक्षाधिन पोलीस उपनिरिक्षक अभिजित चिखलीकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी दत्तात्रय काळे यांनी चिखलीकरांकडून आम्हाला कामाचे नियोजन शिकायला मिळाले, हिम्मत मिळाली आणि पुढे भविष्यात आम्हाला सुध्दा चिखलीकरांसारखे होता यावे यासाठी मी प्रयत्न करणार आहे. द्वारकादास चिखलीकर यांचे सुपूत्र पोलीस उपनिरिक्षक अभिजित चिखलीकर यांनी सांगितले की, मी पोलीस दलात आल्यामुळे माझ्या वडीलांनी मला का वेळ दिला नाही हे मला कळले आहे. माझे वडील कोणाला भित नाहीत आणि मी सुध्दा भिणार नाही असे सांगितले.

 

याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार रामप्रसाद खंडेलवाल यांनी सेवानिवृत्त झालेल्या द्वारकादास चिखलीकर, शेख नजीर, केशवराव मार्लेवाड, पंडीतराव कल्याणकर यांना सेवानिवृत्तीच्या भावी जीवनासाठी शुभकामना दिल्या.याप्रसंगी चिखलीकरांबद्दल बोलतांना खंडेलवाल म्हणाले की, आपण भाग्यवंत आहात ज्या आई-वडीलांनी आपल्याला जन्म दिला ते दोन्ही महान व्यक्तीमत्व तुमच्या सेवानिवृत्ती समारंभात उपस्थित आहेत असे भाग्य कमी लोकांना मिळते.
याप्रसंगी उपस्थित असलेले सेवानिवृत्त पोलीस निरिक्षक भगवान धबडगे यांनी सांगितले की, चिखलीकरांसारखा मित्र मिळणे हे माझे सर्वात मोठे नशिब आहे. त्यांच्यासोबत मी चार जिल्ह्यात काम केल आहे. त्यांच्याकडून मला प्राप्त झालेली मदत मी कधीच विसरणार नाही.
आपल्या सत्काराला उत्तर देतांना द्वारकादास चिखलीकर म्हणाले की, झिरो बजेटमुळे मी नोकरी मिळणार नाही म्हणून पोलीस भरतीमध्ये उतरलो आणि यशस्वी झालो. त्यानंतर मला प्राध्यापक म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध झाली होती. परंतू त्यासाठी द्यावे लागणारे अनुदान उपलब्ध नसल्यामुळे मी त्या नोकरीकडे कानाडोळा केला. मी एम.कॉम असे पद्‌व्युत्तर शिक्षण घेतलेले आहे. त्यामुळे मला मॅनेजमेंट चांगल्याच प्रकारे येते. मला अकाऊंटींग सुध्दा खुप छान येते. माझ्या जीवनात मी कधीच कोणाला घाबरलो नाही कारण मी कधी चुक केलेली नाही. नांदेड जिल्ह्याचा पदभार स्विकारतांना पहिले पोलीस अधिक्षक चंद्रकिशोर मिणा, विजयकुमार मगर, प्रमोद शेवाळे आणि श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासोबत काम करतांनाचे अनुभव सांगितले. आपल्या जीवनात आलेल्या वाईट प्रसंगांना मी कसे सांभाळले याचे विश्लेषण केले. माझ्या पोलीस अंमलदारांचा माझ्या जीवनात मी कधीच कसुरी अहवाल पाठविला नाही. तसेच पोलीस अधिकारी झाल्यानंतर सीआरओ चिखलीकर बोलतो अशी वेळच कधी आली नाही असे चिखलीकर म्हणाले.
याप्रसंगी सर्व सेवानिवृत्त पोलीसांचा डॉ.अश्र्विनी जगताप यांच्या हस्ते सहकुटूंब सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पोलीस उपनिरिक्षक माया भोसले यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन पोलीस कल्याण विभागातील पोलीस अंमलदार राखी कसबे यांनी उत्तम प्रकारे केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *