नांदेड(प्रतिनिधी)-पोटगीचे वॉरंट विना तामिल परत पाठविण्यासाठी 1 हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या उमरी न्यायालयातील बेलीफास भोकरचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश- 2 यांनी तीन हजार रुपये रोख दंड आणि दोन वर्ष शिक्षा ठोठावली आहे.
दिवाणी न्यायालय उमरी येथील बेलीफ संजय नागेंद्रबुवा भारती यांनी धर्माबाद दिवाणी न्यायालयाकडून निघालेले वॉरंट पोटगीसाठी अटक करण्याचे होते. परंतू ते वॉरंट बिना तामील अहवाल पाठविण्यासाठी आणि दोन महिन्याची मुदत वाढवून देण्यासाठी बेलिफ संजय नागेंद्रबुवा भारती यांनी 4 ऑगस्ट 2017 रोजी एक हजार रुपयांची लाच स्विकारली. त्याबद्दल उमरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 180/2017 दाखल करण्यात आला होता. हा खटला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरिक्षक उलेमाले यांनी न्यायालयात दाखल केला होता. या प्रकरणात उपलब्ध असलेले पुरावे ग्राहय मानून अतिरिक्त सत्र न्यायाधीश भोकर-2 यांनी 1 हजारांची लाच स्विकारणारा बेलिफ संजय नागेंद्रबुवा भारती यास आज भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7 प्रमाणे 1 वर्ष शिक्षा व 1 हजार रुपये रोख दंड, कलम 13 प्रमाणे 2 वर्ष शिक्षा आणि 2 हजार रुपये रोख दंड अशी एकूण 3 वर्ष शिक्षा व 3 हजार रुपये रोख दंड ठोठावला आहे. या खटल्यात पोलीस निरिक्षक जमीर नाईक यांनी पैरवी अधिकाऱ्याचे काम केले. त्यांना पोलीस अंमलदार बालाजी तेलंग आणि प्रदीप कंधारे यांनी मदत केली. या दोन्ही शिक्षा एकत्र भोगायाच्या आहेत.
खटल्यात झालेली शिक्षेची माहिती देतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जनतेला आवाहन केले आहे की, कोणी शासकीय अधिकारी, कर्मचारी, त्यांच्यावतीने कोणी खाजगी व्यक्ती कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फि व्यक्तीरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ प्रभावाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचा दुरध्वनी क्रमांक 02462-253512, पोलीस अधिक्षक डॉ.राजकुमार शिंदे यांचा मोबाईल क्रमांक 9623999944 आणि पोलीस उपअधिक्षक राजेंद्र पाटील यांचा मोबाईल क्रमांक 7350197197 यावर माहिती द्यावी असे सांगितले आहे.