गजेंद्र राजपूत यांच्या घरात सापडले 72 लाख 91 हजार 490 रुपये
नांदेड(प्रतिनिधी)-आपली बदली एकदा झाल्यानंतर पुन्हा हट्ट करून नांदेड येथे अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ वर्ग-1 या पदावर पुन्हा येणाऱ्या गजेंद्र राजपूत यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचा वरिष्ठ लिपीक अशा दोघांना रात्री लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 6 लाख 40 हजार रुपये लाच घेतल्यानंतर अटक केली आहे. गजेंद्र राजपूत याच्या घरात 72 लाख 91 हजार 490 रुपये रोख रक्कम सापडली आहे.
31 ऑक्टोबर रोजी सार्वजनिक बांधकाम मंडळाविरुध्द लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे 7.50 लाख रुपये लाचेची मागणी करणारा अर्ज आला. दोन 14 कोटी 10 लाखांच्या मंजुर करून देण्यासाठी अर्धा टक्के रक्कम अशी सरसकट 7 लाख 50 हजार रुपयांची लाच मागणी अधिक्षक अभियंता गजेंद्र हिरालाल राजपूत (54) यांनी केली असल्याची सविस्तर वर्णनाची तक्रार आली होती. यानंतर 1 नोव्हेंबर रोजी पंचासमक्ष या लाच मागणीची पडताळणी झाली तेंव्हा तक्रारदाराने विनोद केशवराव कंधारे (47) वर्ग-3 यांची भेट घेतली त्यांनी आणि त्यांच्यासोबत असलेले लिपीक जयंत धावडे यांच्यासाठी प्रत्येक निविदेचे 25 हजार असे एकूण 50 हजार रुपये मागितले.
त्यानंतर तक्रादार गजेंद्र राजपूत यांना भेटले तेंव्हा काही तरी रक्कम कमी करा अशी विनंती करण्यात आली. तेंव्हा राजपूत यांनी 6 लाख रुपयांची मागणी पंचासमक्ष केली आणि ते पैसे वरिष्ठ लिपीक विनोद कंधारे यांच्याकडे देण्यास सांगितले. तसेच त्यानंतर तक्रारदार विनोद कंधारे यांच्याकडे गेले आणि 6 लाख रुपये राजपूतने तुमच्याकडे देण्यास सांगितले आहेत आणि त्यांच्यासाठी प्रत्येक निविदेचे 20 हजार असे 6 लाख 40 हजार रुपये लाच स्विकारण्यास होकार दर्शविला. त्यानंतर रात्री या प्रकरणाची देवाण-घेवाण झाली आणि 6 लाख 40 हजार रुपये लाच स्विकारल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलीस ठाणे भाग्यनगर येथे या बाबतचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली. आज सकाळी वृत्तलिहिपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरूच होती.
यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गजेंद्र हिरालाल राजपूत यांच्या घराची झडती घेतली असता तेथून सुध्दा 72 लाख 91 हजार 490 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या सापळा कार्यवाहीत पोलीस अधिक्षक डॉ.राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधिक्षक अनिल कटके, गजानन बोडके, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक गजेंद्र मांजरमकर, पोलीस अंमलदार ज्ञानेश्र्वर पचलिंगे, तानाजी मुंडे, गजानन पवार, शेख अकबर, राजेश राठोड, हर्षद खान, गजानन राऊत, प्रकाश मामुलवार आदींनी ही का र्यवाही पुर्ण केली.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही माहिती देतांना जनतेला आवाहन केले आहे की, कोणी शासकीय अधिकारी, कर्मचारी, शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असेल तसेच त्याच्या लाच मागणीचे मोबाईल फोनवर बोलणे असेल,ऑडीओ, व्हिडीओ असेल, एसएमएस असतील तसेच भ्रष्टाचार संबंधाने कांही माहिती असेल तसेच माहिती अधिकारात शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी शासकीय निधीचा भ्रष्टाचार केल्याची माहिती प्राप्त झाली असेल तर याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. त्यासाठी टोल फ्रि क्रमांक 1064(2), कार्यालयाचा फोन क्रमांक 02426-253512 यावर सुध्दा माहिती देता येईल तसेच एसीबी विभागाच्या शासकीय संकेतस्थळावर, मोबाईल ऍपवर आणि फेसबुक पेजवर सुध्दा याची माहिती देता येईल जनतेने भ्रष्टाचार रोखण्यासाठी ही माहिती द्यावी असे आवाहन एसीबी केले आहे.
गजेंद्र राजपूत हे नांदेड येथे कार्यकारी अभियंता असतांना अत्यंत नामांकित व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या काळात सांगवी येथील जुना पुल नवीन करण्यात आला होता आणि त्या पुलाच्या उद्घाटनाच्या दिवशीच सायंकाळी त्यांची बदली करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी पुन्हा अट्टहास करत नांदेड येथे नियुक्ती आणली आणि त्यानंतर त्यांची पदोन्नती होवून सार्वजनिक बांधकाम मंडळ येथे अधिक्षक अभियंता या पदावर काम करत होते. शासकीय नोकरीमध्ये असे म्हणतात एकदा बदली झालेल्या ठिकाणावर पुन्हा जाण्याचा अट्टहास काही तरी त्रास आणतो आणि असेच राजपूत यांच्यासोबत झाले.
सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधिक्षक अभियंता आणि वरिष्ठ लिपीक अडकले 6 लाख 40 हजारांच्या लाच जाळ्यात