नांदेड(प्रतिनिधी)-एका 50 वर्षीय व्यक्तीला जिवे मारणाऱ्या एकाला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी जन्मठेव आणि 75 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणातील इतर आरोपी हे अल्पवयीन विधीसंघर्षग्रस्त बालक आहेत.
दि.31 डिसेंबर 2020 रोजी सावळेश्र्वर पैठण ता.केज जि.बीड येथून आपली मालवाहतुक गाडी क्रमांक एम.एच.26 बी.ई.2483 घेवून युनूस खान गुलाब खान पठाण हे यवतमाळकडे जात असतांना रात्री 9 वाजता विष्णुपूरी जवळ पोहचले. मी तेथून शेख नईम शेख मोईनोद्दीन यांना मला भेटायला येण्यास सांगितले. रात्री1.30 वाजता ते दुधडेअरी जवळ आले. तेथील हनुमान मंदिराजाच्या बाजूूला आम्ही गाडी थांबवली तेथे शेख नईम शेख मोईनोद्दीन (52) ते आणि इतर जण मला भेटायला आले. मी माझ्या जवळची फळांची पिशवी त्यांना देऊन बोलत असतांना माझ्या गाडीमध्ये फळांनी भरलेल्या प्लॅस्टीक कॅरेटचा आवाज आला. मी खाली उतरून मागे पाहिले असता माझ्या गाडीतील कॅरेट एक व्यक्ती काढत होता. त्यालाा विचारणा केली तेंव्हा त्याने इतर तिघांना बोलावले. त्यांनी आपल्याकडील खंजीरने धाक दाखवून आमच्या खिशातील मोबाईल काढला. शेख नईम शेख मोईनोद्दीन त्यांना विरोध करत असतांना लोखंडी खंजरच्या मुठीने शेख नईम यांच्या डोक्यावर पाठीमागे जोरात वार केला. इतर तिघांनी शेख आवेजला खाली लोळवून मारहाण सुरू केली. आम्ही आरडाओरड करताच ते चौघे दरोडेखोर पळून गेले. जखमी अवस्थेतील शेख नईम शेख मोईनोद्दीन यांना दुचाकीवर आम्ही शासकीय रुग्णालयात नेले. तेथून पुन्हा खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पोहचवले . त्यात 1 जानेवारी 2021 रोजी शेख नईम शेख मोईनोद्दीन यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर युनूस खान पठाण यांच्या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण पोलीसांनी गुन्हा क्रमांक 1/2021 दाखल केला. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक विश्र्वास कासले यांनी केला. आरोपींविरुध्द न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केल्यानंतर हा खटला क्रमांक 90/2021 प्रमाणे अजय भगवान माने (22) रा.वसरणी याच्याविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 394, 397, 34 नुसार चालला. या प्रकरणातील इतर तीन आरोपी विधीसंघर्षग्रस्त बालक असल्याने त्यांचा खटला सुरू आहे.
या प्रकरणात 9 साक्षीदार तपासण्यात आले. उपलब्ध पुराव्या आधारे न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी अजय भगवान मानेला भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 34 प्रमाणे जन्मठेप 50 हजार रुपये रोख दंड तसेच कलम 394, 34 प्रमाणे दहा वर्ष सक्तमजुरी आणि 5 हजार रुपये रोख दंड, तसेच कलम 397, 34 प्रमाणे 10 वर्ष सक्तमजुरी आणि 20 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली.या सर्व शिक्षा एकत्रित भोगायच्या आहेत.
दंडातील 50 हजार रुपये रक्कम शेख नईम शेख मोईनोद्दीन यांच्या वारसदारांना देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच निकालाची एक प्रत विधीसेवा प्राधिकरणाला पाठवून कायद्याप्रमाणे मयत शेख नईम शेख मोईनोद्दीन यांच्या कुटूंबियांना नुकसान भरपाई देण्यासाठी आदेशीत करण्यात आले आहे. या खटल्यात पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार फय्याज सिद्दीकी, चंद्रकांत पांचाळ यांनी पैरवी अधिकाऱ्याची भुमिका पुर्ण केली.
50 वर्षीय व्यक्तीचा खून करणाऱ्या 22 वर्षीय युवकाला जन्मठेप आणि 75 हजार रुपये रोख दंड