नांदेड (प्रतिनिधी)-शहरात सध्या दिवाळीची धामधुम सुरू असतांना स्थानिक गुन्हे शाखा पथकाने एका 28 वर्षीय युवकाला एक गावठी पिस्तुल आणि तीन जिवंत काडतुसांसह पकडले आहे.
सन 2022 मध्ये शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका जिवघेणा हल्ला प्रकरणात फरार असलेला रोहन अरुण कांबळे (28) हा तोंडाला दस्ती बांधून आपली ओळख लपवत दुचाकीवर जात असतांना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने त्यास रोखले. त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्तुल आणि तीन जीवंत काडतुसे सापडली. याप्रकरणी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे यांच्या तक्रारीवरुन रोहन कांबळे विरुध्द भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा रोहण कांबळे शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील जिवघेणा हल्ला या सदरात दाखल झालेल्या गुन्हा क्रमांक 440/2022 मध्ये गुन्हा घडला तेंव्हापासून फरार होता. स्थानिक गुन्हे शाखा पथकाने रोहण कांबळेकडून बंदुक, तीन जिवंत काडतुस आणि एक दुचाकी गाडी असा 1 लाख 78 हजारांचा ऐवज जप्त केला आहे.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराय धरणे यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार, पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे, पोलीस अंमलदार गंगाधर कदम, बालाजी तेलंग, गणेश धुमाळ, रणधिर राजबन्सी, ज्वालासिंग बावरी, गजानन बैनवाड, देविदास चव्हाण, बालाजी मुंडे यांचे कौतुक केले आहे.
एक गावठी पिस्तुल आणि तीन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या युवकास स्थानिक गुन्हा शाखेने पकडले