पोलीसांच्या कामात मदत न करता नागरीक व्हिडीओ बनवतात
नांदेड(प्रतिनिधी)-सणांच्या दिवसांमध्ये बाहेर राज्यातील काही गुन्हेगारी टोळके नांदेडला कार्यान्वीत आहेत. त्यासाठी जनतेने थोडीशी दक्षता बाळगली तर मोठ्या घटनांना रोखता येईल असे प्रतिपादन पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले.तसेच शहरात तोंड बांधून फिरणाऱ्या पुरूषांवर आम्ही आता कार्यवाही करणार आहोत. सोबतच एका घटनेच्या संदर्भाने बोलतांना श्रीकृष्ण कोकाटे म्हणाले पोलीसांना मदत करण्याऐवजी त्यांचा व्हिडीओ तयार करण्यात जनतेला रस आहे हे पाहुन दु:ख वाटले.याप्रसंगी अप्पर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार उपस्थित होते .
आज काही गुन्ह्यांच्या संदर्भाने माहिती देतांना पोलीस अधिक्षक बोलत होते. सध्या दिवाळी सणाचा महोत्सव सुरू झाला असून या सणादरम्यान वेगवेगळ्या साहित्याची खरेदी करण्याची लगबग सुरू आहे . त्यामुळे शहराच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. बऱ्याच ठिकाणी आम्ही पोलीस लावलेले आहेत. परंतू जनतेने थोडीशी दक्षता बाळगली तर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यात आम्हाला अत्यंत जलद प्रभावाने काम करता येईल असे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे म्हणाले. गर्दीमध्ये फिरतांना महिला आणि पुरूषांनी आपण इतरांपेक्षा सुरक्षीत अंतरात आहोत याची दक्षता घ्यावी. सोबतच कोणी संशयीत व्यक्ती (महिला आणि पुरूष) दिसल्यास त्याबद्दल आपल्याच आसपासच्या लोकांना मदत मागून पुढे त्याला पोलीसांच्या स्वाधीन करावे. जेणे करून त्या ठिकाणी घडणारा गुन्हा रोखता येईल.
सध्या सोन्याची खरेदी-विक्री जास्त प्रमाणात असते. याप्रसंगात बाहेर राज्यातील ओरीसा आणि केरळ या राज्यातून बऱ्याच गुन्हेगारी टोळ्या कार्यरत होतात.सराफा व्यापाऱ्यांच्या दररोजच्या वागण्याची रेकी करतांना त्यांच्याच दुकानासमोर काही तरी छोटी-मोठी वस्तु विक्रीची दुकान लावतात आणि सोने व्यापाऱ्याची रेकी पुर्ण झाल्यावर त्याच्या ऐवजावर डल्ला मारतात. सोने व्यवसायीक या काळात मोठी रोख रक्कम घेवून एकटेच त्याची वाहतुक करतात अशाा प्रसंगात त्यांनी आपल्या व्यवसाय प्रतिष्ठाणाच्या जवळ असलेल्या पोलीस ठाण्यात मदत मागितली तर आम्ही त्याला सुरक्षा देवून त्यांच्या गतंव्यापर्यंत पोहचून देवू असे सांगितले.
भाग्यनगरचे पोलीस निरिक्षक सुर्यमोहन बोलमवाड हे महिलांच्या चैन स्नेचिंग करणाऱ्या आरोपीला पकडत असतांना ते आणि त्यांच्यासोबत एकच पोलीस होता पण आरोपी दोन पकडायचे होते. तेथे झालेल्या झटापटीच्यावेळी जनतेतील नागरीक त्या घटनेचा व्हिडीओ बनविण्यात व्यस्त होते. त्यांनी पोलीसांना मदत केली नाही. याबाबत दु:ख वाटते. आम्ही पोलीस जनतेच्या सुरक्षेसाठी वचनबध्द आहोतच परंतू आम्ही अडचणीत असू तेंव्हा जनतेने सुध्दा आम्हाला मदत करण्याची अपेक्षा आहे असे श्रीकृष्ण कोकाटे म्हणाले. आम्ही काही सुपरमॅन नाहीत जनतेच्या मदतीनेच जनतेच्या सुरक्षेचा डोलारा सांभाळण्यात आम्हाला यश येणार आहे. तेंव्हा जनतेने सुध्दा आम्ही त्यांचाच एक भाग आहोत असे समजून आम्हाला अडचण असेल तेंव्हा आमची मदत करायला हवी. छोटीशी दक्षता बाळगली तर जनतेमध्ये घडणारे गुन्हे आम्ही उत्कृष्ट प्रकारे रोखू शकू, असे श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले .
शहरात 59 सीसीटीव्ही पैकी 35 सीसीटीव्ही कॅमेरे सुरू आहेत. सोबतच मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर शहरात 1 हजार सीसीटीव्ही लावण्याच्या कामाला मान्यता मिळाली असून ती अंमलबजावणी लवकर व्हावी यासाठी मी प्रयत्न करत असल्याचे श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले.
जनतेने थोडीशी दक्षता बाळगली तर गुन्ह्यांवर नियंत्रण आणता येईल-श्रीकृष्ण कोकाटे